आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी अस्वस्थ पण नाराज नाही, पुन्हा शून्यातून सुरुवात करणार' - भाजप नेत्या पंकजा मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : मी अस्वस्थ आहे पण नाराज नाही, असे सांगतानाच आपल्यावर होणारी टीका खोडून काढण्यासाठी पुन्हा एकदा शून्यातून उभे राहून दाखवायचे असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथे १२ डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात आला होता. यात पंकजांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडउघड टीका केली होती. यानंतर फडणवीस यांनीही यावर भाष्य केले होते. यावर या मुलाखतीत पंकजा बोलल्या.

वडिलांमुळे सगळं मिळालं, अशी टीका माझ्यावर केली जाते. ही टीका मला मोडून काढायची असून पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात आहे. करण्यासाठीच आपण भाजपच्या कोअर कमिटीचा राजीनामा देत आता भाजपची एक कार्यकर्ता म्हणून काम असल्याचे पंकजा म्हणाल्या. अजित पवार आणि फडणवीस यांनी एका रात्रीतून सरकार स्थापन केले. टीव्हीवरून सर्वप्रथम आपल्याला ही बातमी कळाली. मी पक्षाची कोअर टीमची सदस्य असतानाही आपल्याला ही माहिती नव्हती, असे पंकजा म्हणाल्या. केवळ ८० तासच हे सरकार टिकल्याने आपल्याला सरकार स्थापनेचा फारसा आनंद झाला नसल्याचे पंकजा म्हणाल्या.

पक्षावर मी नाराज नाही पण अस्वस्थ असल्याचे मात्र त्यांनी या मुलाखतीत मान्य केले. माझ्या विरोधात वावड्या उठवल्या गेल्याने आपण अस्वस्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी आमदार झाले नाही याचे दु:ख असले तरी मी अनेकांना आमदार केल्याचा आनंद होत आहे. गोपीनाथ गडावर अनेक जणांनी भाषणातून काही विचार व्यक्त केले. व्यक्त करणे म्हणजे पक्षविरोधात जाणे होत नाही.

जातीयवादाच्या दृष्टीने कधीच बोलत नाही

आपण गोपीनाथगडावर 'भाजप मूठभर लोकांचा पक्ष होऊ नये' असे बोलले. हे उद‌्गार जातीयवादाच्या अनुषंगाने अजिबात नव्हते. आपण कधीही जातीयवादाच्या दृष्टीने बोलत नाही. एका समाजापुरते आपले काम नाही, असेही त्या म्हणाल्या.

देवेंद्र हे मित्रच; तेही मला मित्र मानत असतीलच

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची भावना काय आहे, हे सांगताना पंकजांनी 'ते माझे मित्र आहेत. असे मित्र आहेत, ज्यांच्याकडे मी माझी मते स्पष्टपणे मांडते. आणि ते मित्र राहतील. देवेंद्र यांचे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी आहे. पण, तेही मला मित्रच मानत असतील.' असे उत्तर त्यांनी दिले.
 

बातम्या आणखी आहेत...