आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्व. मुंडेंचा मतदारसंघ विकण्याचे पाप भाजपच्या नेतृत्वाने केले; रमेश कराड यांचा सणसणीत आराेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे रेणापूर मतदारसंघातून निवडून यायचे. पुनर्रचनेनंतर रेणापूरचा समावेश लातूर ग्रामीणमध्ये झाला. हाच गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ काँग्रेसला विकण्याचे पाप सध्याच्या भाजप नेतृत्वाने केले आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंनी वस्ती-वाड्या-तांड्यावर अनवाणी जाऊन भाजप वाढवली त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संपवण्याचा विडा भाजपच्या मंडळींनी उचलला आहे, असा घणाघाती आरोप करीत रमेश कराड यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे.

मागील दोन निवडणुकीत काठावर पराभव झाल्यानंतर रमेश कराडांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजप जिवंत ठेवली. एवढेच नव्हे तर बारा जिल्हा परिषद सदस्य, रेणापूर पंचायत समिती, रेणापूर नगर पंचायत, सोसायट्या, ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा फडकवला. त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना ऐनवेळी हा मतदारसंघच शिवसेनेला सोडण्यात आला. सेनेने तेथे अनोळखी सचिन देशमुख या व्यक्तीला उमेदवारी दिली. यामुळे हा मतदारसंघ ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा दोन दिवसांपासून आहे. या अस्वस्थतेला मोकळी वाट करून देण्यासाठी गुरुवारी लातूरमध्ये रमेश कराड समर्थकांनी संकल्प मेळावा आयोजित केला होता. लातूर ग्रामीण मतदारसंघातील सर्व सदस्यांनी बुधवारीच पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पाठवले आहेत. या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गुरुवारच्या मेळाव्यात रमेश कराडांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. सुमारे तीन तास कार्यकर्त्यांची भाषणे झाल्यानंतर खचाखच भरलेल्या मंगल कार्यालयात रमेश कराडांनी घणाघाती भाषण केले. 
 

रमेश कराड यांचा अपक्ष लढण्याचा इशारा
कराड म्हणाले, २००४ साली गोपीनाथ मुंडेंनी हाताला धरून भाजपत आणले. रेणापूर मतदारसंघाला ते आपली आई मानायचे. मात्र याच रेणापूर मतदारसंघाला पैशांच्या बदल्यात विकण्याचे पाप भाजपच्या नेत्यांनी केले आहे. गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवायचे कारस्थान सुरू आहे. हे कोण करतंय, का करतंय माहीत नाही. परंतु लातूर ग्रामीण मतदारसंघातील प्रस्थापितांना संपवण्यासाठी मी कधीच मागे हटणार नाही. मला पक्षाच्या वरिष्ठांनी वाऱ्यावर सोडले असले तरी मी त्यांना अंतर देणार नाही अशी साद घालत त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला. 
 
 

बातम्या आणखी आहेत...