आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर, उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का; सात महापालिकांत भाजपची सत्ता कायम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 महापालिकांत महापाैर-उपमहापाैरपदांची निवडणूक
  • मुंबईतील सत्ता राखत शिवसेनेने उल्हासनगरही घेतले ताब्यात; लातूर पुन्हा काँग्रेसने मिळवले

२०१७ मध्ये निवडणुका झालेल्या ११ महानगरपालिकांतील महापाैर-उपमहापाैरपदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पुढील अडीच वर्षांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात अाली. राज्यात उदयास येत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व हाेते. मात्र लातूर, उल्हासनगर वगळता इतर मनपांत भाजपने सत्ता कायम राखली. लातुरात भाजपला धक्का देत काँग्रेसचा महापाैर विजयी झाला तर उल्हासनगरमध्ये सेनेेने काँग्रेस, कलानी गटाच्या मदतीने भाजपला पायउतार करत भगवा फडकवला.

उल्हासनगर : अडीच वर्षांत शिवसेनेने खेचून घेतली भाजपकडून सत्ता
राज्यातील बदलत्या राजकीय घडामाेडींचे पडसाद उल्हासनगर महापालिकेत दिसले. २०१७ मध्ये शिवसेनेला बाजूला सारत भाजपने सत्ता काबीज केली हाेती. मात्र, अडीच वर्षांनंतर शुक्रवारी महापाैर-उपमहापाैर निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेस व टीम ओमी कलानी यांच्या मदतीने भाजपचा पराभव करत पुन्हा एकदा भगवा फडकवला. महापाैरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अाशान यांची निवड झाली. त्यांच्याविराेधात भाजपने जीवन इदनानी यांना उमेदवारी दिली हाेती. अशान यांना ४३ तर इदनानी यांना ३५ मते पडली. ८ मतांनी शिवसेनेचा विजय झाला. २०१७ च्या महापाैरपद निवडणुकीत भाजपसाेबत असलेल्या टीम अाेमी कलानी गटाच्या १० नगरसेवकांनी सेनेला साथ दिली. उपमहापाैरपदी सेनेने रिपाइंचे भगवान भालेराव यांना संधी दिली. भाजपचे विजू पाटील पराभूत झाले. भालेराव यांना ४४, तर पाटील यांना ३४ मते पडली.
- कलानी गटाच्या १० नगरसेवकांनी या वेळी दिली शिवसेनेला साथ, ८ मतांनी सेनेचा झाला विजय

मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता कायम, भाजप तटस्थ
मुंबई मनपावर शिवसेनेची सत्ता कायम राहिली. किशाेरी पेडणेकर यांची महापाैरपदी, तर सुहास वाडकर यांची उपमहापाैरपदी बिनविराेध निवड झाली. राज्यात युती तुटली तरी मनपातील दुसरा माेठा पक्ष भाजपने २०१७ प्रमाणे याही वेळी तटस्थ राहण्याचे ठरवल्याने शिवसेनेचा मार्ग माेकळा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अादित्य ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
- भाजप यंदाही २०१७ प्रमाणे तटस्थ राहिल्याने शिवसेनेचा मुंबईत सत्तेचा मार्ग मोकळा...

लातूर : काँग्रेसचा भाजपला धक्का; २ सदस्य फाेडून मिळवली सत्ता
राज्यात सत्ताबदलाची चाहूल लागताच भाजपच्या दोन नगरसेवकांनी बंड करीत काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे लातूर मनपाची सत्ता भाजपच्या ताब्यातून काँग्रेसकडे पुन्हा अाली. भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौरपदी विराजमान झाले. ६८ पैकी काँग्रेसला ३५ आणि भाजपला ३३ मते पडली. उपमहापौरपदाची संधी काँग्रेसने भाजपचे बंडखाेर चंद्रकांत बिराजदार यांना दिली. त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री कौळखैरे यांचा पराभव केला. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस अामदार अमित देशमुख गटाला हादरा देत ही मनपा जिंकली हाेती. मात्र, अडीच वर्षांतच देशमुखांनी निलंगेकरांना हादरा देत पराभवाची परतफेड केली.
- देशमुख गटाने दिला संभाजी पाटील निलंगेकर गटाला धक्का, भाजप बंडखोर झाला उपमहापौर

नागपूरच्या महापौरपदी जोशी, मनीषा काेठे उपमहापाैर
नागपूर महापालिकेच्या महापाैरपदी भाजपचे संदीप जाेशी व उपमहापाैरपदी भाजपच्याच मनीषा काेठे यांची शुक्रवारी निवड झाली. या मनपात भाजप बहुमतात अाहे. काँग्रेस अाघाडीच्या वतीने महापाैरपदासाठी हर्षला साबळे तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपचे जोशी, काेठे यांना प्रत्येकी १०४, तर अाघाडीचे साबळे व पेठे यांना प्रत्येकी २६ मते पडली.

चंद्रपूरचे महापाैरपद भाजपकडेच, राखी कचर्लावार विजयी
चंद्रपूर महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपकडेच पुढील अडीच वर्षांसाठी महापाैर, उपमहापाैरपद राहणार अाहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महापाैरपदी राखी कचर्लावार आणि उपमहापौरपदी स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे हे निवडून आले. काँग्रेस अाघाडीच्या उमेदवार कल्पना लहामगे यांना २२ तर भाजपच्या कचर्लावार यांना ४२ मते पडली.

अकाेला महापाैरपदी अर्चना मसने
भाजपचे बहुमत असलेल्या अकाेला महापालिकेच्या नूतन महापाैरपदी भाजपच्या अर्चना मसने यांची तर उपमहापाैरपदी राजेंद्र गिरी यांची निवड झाली. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा लाभ हाेईल, या अाशेने काँग्रेसने संख्याबळ नसतानाही भाजपविराेधात उमेदवार दिले हाेते. मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक गैरहजर राहिले तर शिवसेना तटस्थ राहिल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. महापाैरपद निवडणुकीत मसने यांच्याविराेधात काँग्रेसच्या अजराबी नजरीन यांना उमेदवारी दिली हाेती. मात्र त्यांचा ३५ मतांनी पराभव झाला. मसने यांना ४८ तर नजरीन यांना १३ मते पडली. उपमहापाैरपद निवडणुकीतही भाजपचे गिरी यांनी काँग्रेसच्या पराग कांबळे यांचा असाच ३५ मतांनी पराभव केला.

अमरावती महापाैरपदी भाजपचे चेतन गावंडे
बहुमत असलेल्या भाजपने अमरावती महापालिकेतील सत्ता कायम राखली. महापाैरपद निवडणुकीत भाजपचे चेतन गावंडे यांना ४९ तर प्रतिस्पर्धी एमआयएमच्या अफजल हुसेन मुबारक खान यांना २३ मते पडली. काँग्रेसच्या उमेदवारांनी एेनवेळी माघार घेऊन एमअायएमला मतदान केले. तिसऱ्या उमेदवार बसपच्या माला देवकर यांना त्यांच्या पक्षाची ५ मते मिळाली. उपमहापौरपद िनवडणुकीत भाजपच्या कुसुम साहू यांनी ४९ मते मिळवत एमआयएमचे उमेदवार मोहंमद साबीर मोहंमद नासीर यांचा पराभव केला. माेहंमद साबीर यांना २३ मते तर बसपाच्या इशरत बानो मन्नान खान यांना ५ मते िमळाली.

पुणे महापाैरपदी मुरलीधर माेहाेळ
पुणे महापालिकेत भाजपचे बहुमत अाहे. या पक्षाचे मुरलीधर माेहाेळ यांची महापाैरपदी तर सरस्वती शेेंडगे यांची उपमहापाैरपदी शुक्रवारी निवड झाली. माेहाेळ यांच्याविराेधात राष्ट्रवादीने प्रकाश कदम यांना उमेदवारी दिली हाेती. माेहाेळ यांना ९७ तर कदम यांना ५९ मते मिळाली. ३६ मतांनी भाजपचा विजय झाला. उपमहापाैरपद निवडणुकीत भाजपच्या सरस्वती शेंडगे यांना ९७ तर काँग्रेस अाघाडीचे उमेदवार चांदबी हाजी नदाफ यांना ५९ मते पडली.

पिंपरी महापाैरपदी भाजपच्या उषा ढाेरे
पिंपरी-चिंचवडच्या महापाैरपदी भाजपच्या उषा ढाेरे यांची तर उपमहापाैरपदी तुषार हिंगे यांची निवड झाली. भाजपचे बहुमत असलेल्या या मनपात ढाेरे यांच्याविराेधात राष्ट्रवादीकडून स्वाती काटे यांना उमेदवारी दिली हाेती. ढाेरे यांना ८१ तर काटे यांना ४१ मते पडली. उपमहापाैरपदासाठी हिंगे यांच्याविराेधात राष्ट्रवादीचे राजू बनसाेडे यांनी अर्ज दाखल केला हाेता. मात्र भाजपच्या विनंतीवरून बनसाेडे यांनी माघार घेतल्याने हिंगे यांची बिनविराेध निवड झाली.

काँग्रेसने राखली परभणी मनपाची सत्ता
काठावरचे बहुमत असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीतील एका गटाच्या मदतीने मनपातील सत्ता कायम राखली. महापौरपदी अनिता सोनकांबळे तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे विजयी झाले. साेनकांबळे यांच्याविराेधात भाजपच्या मंगल मुदगलकर यांनी निवडणूक लढवली. साेनकांबळेंना ३७ तर भाजपला फक्त ८ मते मिळाली. शिवसेनेचे ४ सदस्य तटस्थ राहिले. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे भगवान वाघमारे यांना ३७ तर भाजपचे मोकिंद खिल्लारे यांना ८ मते पडली.

नाशिकमध्ये मनसेच्या मदतीने राखली भाजपने सत्ता
राज्यातील नव्या समीकरणानुसार, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने नाशिक महापालिकेत एकत्र येत भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ताे अयशस्वी ठरला. मात्र मनसे व काँग्रेसच्या मदतीने भाजपने या नव्या अाघाडीचा डाव उधळून लावला. महापाैरपदी सतीश कुलकर्णी तर उपमहापाैरपदी भिकुबाई बागुल यांची बिनविराेध निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...