आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला : संजय राऊत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- शिवसेनेची राम मंदिराबाबतची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिर उभारण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे मंदिराचे काय करायचे आहे ते देशातील तमाम हिंदू बांधवांच्या मदतीने आता आम्ही पाहू. त्यामुळे रामाविषयी, हनुमानाविषयी तसेच राम मंदिराविषयी बोलण्याचा भाजपवाल्यांना आता अधिकार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येत्या २४ डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार राऊत येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, अनिल देसाई अरविंद सावंत, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राऊत म्हणाले, प्रभू रामचंद्राचे भक्त असलेल्या हनुमानाची मोघलांनीदेखील इतकी विटंबना केली नाही तितकी विटंबना भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. कारण भाजपमधील एक जण म्हणतो हनुमान चिनी आहे. अरे चिनी म्हणजे हनुमान काय बनावट आहे काय, बोगस आहे काय. कारण चिनी वस्तू बोगस असतात. तर दुसरा एक महाभाग म्हणतो ते मुसलमान आहेत. हनुमानाची जात ठरविणारी ही मंडळी उद्या अयोध्येतील हनुमान गडी देखील मशिद आहे म्हणून तोडण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. या मंडळींना रामायणावर बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातील अनेक नेते मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी शिवसेनेचा पायरीसारखा उपयोग करून घेतला. या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, शिवसेनेने राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. चार वर्षापूर्वी काय झाले, पाच वर्षापूर्वी काय झाले यामध्ये शिवसेना शिरत नाही. कारण शिवसेना भूतकाळात जात नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तमान आणि भविष्याविषयी बोला. शिवसेनेचे भविष्य उज्ज्वल आहे. शिवसेना राज्यात नव्हे तर देशात आता नवा इतिहास घडवेल. ज्या लोकांनी शिवसेनेचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला असेल तर त्यांना सेना निश्चित त्यांची पायरी दाखवेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

 

पत्रकार परिषदेअगोदर शिवसेनेच्या राऊतांसमवेत इतर नेते मंडळींनी हेलिपॅड, सभेचे ठिकाण, चंद्रभागेच्या पैलतीरावरील आरतीचे ठिकाण असलेला इस्काॅनचा घाट आदींची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील. जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संपर्क प्रमुख महिला आघाडी संजना घाडी, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे, जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, महिला सन्मवयक सोलापूर शैला स्वामी, जिल्हा महिला आघाडी संघटक उज्ज्वला येलुरे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, तालुका प्रमुख महावीर देशमुख. युवासेना सहसंपर्क प्रमुख अतुल राजूरकर, प्रसिध्दी प्रमुख विनोद कदम आदी उपस्थित होते. 

 

...तर मोदींना बांबूचा कारखाना काढावा लागेल 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक विधान केले आहे, ते म्हणतात की, आमचे लोक जरा अति बोलतात. त्यामुळे त्यांच्या तोंडात बांबू घातला पाहिजे. गडकरींच्या या वक्तव्याचा विचार केला तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुतेक देशात एक मोठा बांबूचा कारखानाच काढावा लागेल, अशी टिप्पणी शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली. भाजपच्या नेत्यांमध्ये रामभक्त हनुमानाची जात ठरविण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यावर टीका करताना ते बोलत होते. 

बातम्या आणखी आहेत...