आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP Maintained One Seat In Uttarakhand, Three Seats In West Bengal Towards Trinamool,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगालमधील तिन्ही जागा तृणमूलकडे, उत्तराखंडमधील एक जागा भाजपने राखली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कालियागंज आणि खरगपूर सदर या मतदारसंघांत तृणमूलचा प्रथमच विजय
  • हा एनआरसीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल : ममता बॅनर्जी

​​​​​​​कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पोटनिवडणुकीत विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकल्या आहेत, तर उत्तराखंडमध्ये एका जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. तेथे गेल्या सोमवारी मतदान झाले होते.

पश्चिम बंगालमधील करीमपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बिमलेंदू सिन्हा राॅय यांनी आपले नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराचा २४ हजार ७३ मतांनी पराभव केला. कालियागंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत झाली. तीत तृणमूलचे तपनदेव सिन्हा यांनी भाजप उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा २ हजार ४१८ मतांनी पराभव केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे परमतानंत राॅय हे विजयी झाले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांची मुलगी धृताश्री यांना मैदानात उतरवले होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. कालियागंज हा मतदारसंघ रायगंज लोकसभा मतदारसंघात येतो. या लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला होता. तृणमूल काँग्रेसचे प्रदीप सरकार यांनी खरगपूर सदर हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रेमचंद्र झा यांचा २० हजार ७८८ मतांनी पराभव केला. खरगपूर मतदारसंघातील पराभव भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांची मेदिनीपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. खरगपूर विधानसभा मतदारसंघ मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघात येतो. कालियागंज आणि खरगपूर सदर या मतदारसंघांत तृणमूलने प्रथमच विजय मिळवला आहे.

एनआरसीबद्दलचा गोंधळ हे पराभवाचे कारण : भाजप

एनआरसीच्या प्रस्तावित अंमलबजावणीवरून उडालेला गोंधळ हे भाजपच्या पराभवाचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे कालियागंज मतदारसंघातील उमेदवार कमलचंद्र सरकार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतरही भाजपचा पराभव झाला. एनआरसीच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर मोठा गोंधळ उडाला.

कर्नाटक पोटनिवडणुकीत सर्व १५ जागा जिंकू : भाजपचा दावा

बंगळुरू : कर्नाटकमध्ये ५ डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत आम्ही सर्व १५ जागा जिंकू, असा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे. पक्षाचे मंत्री सी. टी. रवी म्हणाले की, पोटनिवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन करू, असे स्वप्न काँग्रेस आणि जेडीएस दिवसाढवळ्या पाहत आहेत.

उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय

उत्तराखंडमधील पिथोरागड मतदारसंघात भाजपचे चंद्रा पंत यांनी काँग्रेसच्या उमेदवार अंजू लुंथी यांचा ३००० मतांनी पराभव करून ही जागा कायम राखली. भाजप आमदार प्रकाश पंत यांचे जूनमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. भाजपने तेथे त्यांच्या पत्नी चंद्रा पंत यांना उमेदवारी दिली होती. चंद्रा पंत यांना २६ हजार ८६ तर अंजू लंथी यांना २२ हजार ८१९ मते मिळाली.

'काँग्रेस, माकपही राज्यात भाजपलाच मदत करत आहेत'

तृणमूल काँग्रेसचा हा विजय धर्मनिरपेक्षता आणि एकतेचा असून एनआरसीच्या विरोधात दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. ममता म्हणाल्या की, भाजपची घमेंड वाढली होती, या पक्षाने राज्यातील जनतेचा अपमान केला होता. त्याच्या विरोधात जनतेने मतदान केले आहे. हा विजय आम्ही राज्यातील जनतेला अर्पण करत आहोत. भाजपच्या धोरणाविरोधात जनतेने मतदान केले आहे. जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. या देशातील कायदेशीर नागरिकांना त्यांना निर्वासित करायचे आहे आणि त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवायचे आहे. काँग्रेस आणि माकप हे पक्ष स्वत:ला मजबूत करण्याएेवजी राज्यात भाजपला मदत करत आहेत, असा आरोपही ममता यांनी केला. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना ममता म्हणाल्या की, भाजपची उलटगणती सुरू झाली आहे हे महाराष्ट्र, हरियाणाच्या उदाहरणांवरून दिसले आहे. भाजपला रोजगार निर्मिती अथवा विकासात रस नाही. त्यांना धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्यात आणि लोकांना धमक्या देण्यातच जास्त रस आहे.