आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP MLA Balram Thawani Kicks Woman Complaining Water Scarcity In Gujarat, Video Goes Viral

पाण्याची समस्या मांडण्यासाठी गेलेल्या महिलेला BJP आमदाराने केली बेदम मारहाण; रस्त्यावर लोळवून मारल्या लाथा-बुक्क्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - देशभर सामान्य लोक पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. अशात गाऱ्हाणे मांडण्यासाठी एका भाजप आमदाराकडे गेलेल्या महिलेचे काय हाल झाले त्याचाच एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हीडिओ अहमदाबाद येथे रविवारी रेकॉर्ड झाला. यामध्ये भाजपचा आमदार बलराम थवानी एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून आला. त्याने महिलेला रस्त्यावर आणून अगदी लोळवून मारहाण केली. तिची चूक एवढीच की ती पाण्याची समस्या मांडण्यासाठी नेत्याकडे गेली होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या क्लिपवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, पीडित महिलेचे नाव नीतू तेजवानी असून ती नरोडा परिसरात पाण्याची समस्या मांडण्यासाठी आमदाराकडे गेली होती. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तक्रार ऐकल्यानंतर आमदाराने तिच्याविरुद्ध असभ्य भाषा वापरली. यानंतर अचानक लाथा-बुक्क्या मारण्यास सुरुवात केली. महिलेसोबत तिचा पती देखील होता. आमदाराच्या समर्थकांनी पतीला सुद्धा मारहाण केली. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सत्तेमध्ये महिला सुरक्षित कशा नाहीत असा सवाल पीडितेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पीडित महिला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या असल्याचे सांगण्यात आले आहे.


जिग्नेश मेवाणीकडून घटनेचा तीव्र निषेध
गुजरातमध्ये आमदार असलेले जिग्नेश मेवाणी यांनी या घटनेचा व्हीडिओ ट्विट करून तीव्र निषेध नोंदवला. एक महिला पाण्याची समस्या मांडण्यासाठी आमदाराकडे जाते. आणि भाजपचा आमदार बलराम थवानी तिला रस्त्यावर आणून मारहाण करतो. पोलिसांनी आरोपीला वेळीच अटक करायला हवी. असले कृत्य मुळीच खपवून घेतले जाणार नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत.


काय म्हणाला आरोपी आमदार...
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ राज्यच नव्हे, तर देशभरात फेसबूक आणि ट्विटरवर लोकांनी या घटनेचा निषेध केला. यानंतर भाजप आमदार थवानीची प्रतिक्रिया समोर आली. व्हीडिओ पाहिल्यानंतर आपल्याला चूक लक्षात आली. आपण भावनेच्या भरात वाहून खूप मोठी चूक केली. "मी आपली चूक मान्य करतो. असे मुद्दाम केलेले नाही. मी गेल्या 22 वर्षांपासून राजकारणात आहे. परंतु, अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी कधीच केले नाही. मी संबंधित महिलेची माफी मागतो." असे स्पष्टीकरण आमदाराने दिले. या घटनेनंतर आमदाराचे काही फोटो देखील समोर आले. त्यामध्ये पीडित महिला जखमी हाताने आमदाराला राखी बांधताना आणि त्यानंतर आमदार तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना दिसून आले. आपण महिलेची माफी मागितली असे आमदाराने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.