आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, महिला पोलिस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा - तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंग प्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. चरण वाघमारे यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

16 सप्टेंबरला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. दरम्यान नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीसही उपस्थित होत्या. यादरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष अनिल जिभकाटे आणि आमदार चरण वाघमारे यांनी आपल्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि विनयभंग केल्याचा आरोप करत महिला अधिकाऱ्यांनी 18 सप्टेंबरला तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याचे समजताच आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशन गाठले. आणि मला अटक करा अशी मागणी करत रात्रीच्या तीन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनचा घेराव करून राहिले. त्यानंतर पाच दिवसात चौकशी केल्यावर निर्णय घेऊ असे पोलिसांनी सांगितल्यावर चरण वाघमारे आपल्या समर्थकांसह परतले. 

पोलिसांनी वाघमारे यांना शनिवारी (28 सप्टेंबर) सकाळी राहत्या घरून अटक केली आणि भंडारा पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या अटकेची माहिती होताच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द खासदार भंडारा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले होते. वाघमारे यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या अटकेनंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारावर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले आहे.
 

दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या आमदार चरण वाघमारे यांना तुमसर न्यायालयाने दहा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता आमदार वाघमारे यांचा दहा ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात मुक्काम राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर असल्याने आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.