आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव मतदारसंघातील भाजपत गटबाज; सदस्य नाेंदणीच्या बॅनरवर आ. देशमुखांचाच फोटो गायब!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - माजलगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत शह काटशहाचे राजकारण रंगू लागले आहे.लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपत दाखल झालेले मोहन जगताप यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या बॅनरवर पक्षाचे विद्यमान आमदार आर. टी. देशमुखांना कुठेच स्थान दिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे माजलगाव भाजपत गटबाजी उफाळून आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे नेमकी पक्षाची उमेदवारी कोणाला देणार हा तिढा कायम आहे. 

माजलगाव विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारी मिळावी म्हणून भाजपकडून  रमेश आडसकर, मोहन जगताप हे विविध कार्यक्रम घेऊन सामान्य जनतेत जात आहेत. भाजपकडून  सध्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून कोणता नेता जास्त सदस्य नोंदणी करतो यावर विधानसभेच्या उमेदवारीचे गणित अवलंबून  आहे, असे दिसून येत आहे. माजलगावात भाजपचे विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांनी पक्षाची अधिकृत सदस्य नोंदणीचा कार्यक्रम दहा दिवसांपूर्वीच घेत  नोंदणीला सुरुवात केली परंतु त्यांना  शह देण्यासाठी  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले मोहन जगताप यांनी  आर.टी. देशमुख यांना डावलून पक्षाची सदस्य नोंदणीचा कार्यक्रम  रविवार ४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केला आहे.  माजलगाव शहरात विविध  ठिकठिकाणी बॅनर देखील लावण्यात आले परंतु सदरील बॅनरवर  आमदार आर.टी. देशमुख यांचा कुठेच  फोटो नाही.  भाजपत नव्याने आलेले मोहन जगताप यांनी  पक्षात राहून आपली वेगळी चूल  मांडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना  देखील जगताप यांनी  माजी मंत्री प्रकाश सोळंके  यांच्या बरोबर असाही शह काटशहाचे राजकारण केले होते.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  राहून  जगताप यांनी  २०१४ च्या  विधानसभेला आर.टी. देशमुख यांना उघड मदत  केली होती.  पक्षात राहून पक्षाच्या विद्यमान  आमदाराला विरोध करण्याचा कित्ता ते या ठिकाणी देखील गिरवू लागल्याने भविष्यात भाजपत उभी फूट पडते की काय अशी शंकादेखील उपस्थित होऊ लागली आहे.  
 

..आम्ही का बोलवायचे 
आमदार आर.टी देशमुखांनी काही दिवसांपूर्वी भाजप सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला. त्यात मला डावलले. त्यामुळे आम्ही आता रविवारी घेत असलेल्या कार्यक्रमातून त्यांना डावलले आहे. 
 मोहन जगताप, भाजप नेते माजलगाव.