आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडे ४० हजार कोटी परत देण्यासाठीच ८० तासांचा सीएम, भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचा गौप्यस्फोट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे खासदार आणि माजी मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या नव्या विधानामुळे सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूरमध्ये रविवारी रात्री एका निवडणूक प्रचारसभेत हेगडे म्हणाले, महाराष्ट्रात संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी  ८० तासांचे मुख्यमंत्री बनून केंद्राचे ४० हजार कोटी रुपये परत पाठवले. यानंतर एकच खळबळ उडत आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. देवेंद्र फडणवीस यांनी असे वृत्त पूर्णपणे निरर्थक असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल करत फडणवीसांवर टीका केली. दरम्यान, हेगडेंवर भाजप हायकमांड नाराज असून त्यांना समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.काय म्हणाले अनंतकुमार हेगडे...

मुख्यमंत्र्याकडे केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी आला होता. ३ पक्षांचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट होताच फडणवीसांनी राताेरात हालचाली करून सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. १५ तासांत हा निधी केंद्राला परत पाठवण्यात आला. महाआघाडीचे सरकार त्याचा गैरवापर करील हे त्यांना माहीत होते. यामुळे हे नाट्य घडवण्यात आले.देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण 

हे धादांत खोटे आहे. मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. अर्थ मंत्रालयाने चौकशी करून वास्तव जनतेसमोर मांडावे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्याला एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने पाठवलेला निधी परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे.  शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचा भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादी

केंद्राला ४० हजार कोटींइतका निधी परत करणे राज्य शासनासाठी अशक्य आहे. तथापि, खरेच असे झाले असेल पंतप्रधानांनी  राजीनामा द्यावा. हा महाराष्ट्रासह  इतर राज्यांवरही अन्याय आहे.  नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते... हा तर महाराष्ट्रासोबत विश्वासघातच : शिवसेना

हेगडे म्हणताहेत की फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनून केंद्राला ४० हजार कोटी रुपये परत केले. हा महाराष्ट्राचा विश्वासघात आहे. फडणवीस व भाजप हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. राज्याचे मुख्य सचिव याबाबत स्पष्टीकरण देतील.  - संजय राऊत, शिवसेना खासदार 
 

फडणवीसांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही : काँग्रेस
राज्य कर्जात आहे. केंद्राने दिलेला मदत निधी परत पाठवणे चुकीचे आहे. फडणवीसांनी असे केले असेल तर ते महाराष्ट्रद्रोही काम आहे. पैसे परत गेले असतील तर फडणवीस यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.” - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते

बातम्या आणखी आहेत...