आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- समांतर योजनेवर न्यायालयाबाहेर तडजोड व्हावी यासाठी भाजपचे एक खासदार राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर दबाव अाणत आहेत. त्यामुळे शहा मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकत असल्याने हा प्रश्न रेंगाळल्याचा आरोप आमदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. यास आ. अतुल सावे आणि संजय केणेकर यांनी आक्षेप घेतला. शेवटी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हस्तक्षेप करत मनपाच्या येत्या सभेत समांतरवर निर्णय झाल्यानंतर शासन आपली भूमिका स्पष्ट करेल असे सांगितले.
कदमांच्या वक्तव्याचा आधार घेत हल्लाबोल : जलील यांनी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा आधार घेत समांतर योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. जलील यांच्या आरोपास केणेकर यांनी आक्षेप घेत पक्षाच्या अध्यक्षांवर असे आरोप कसे करता? अशी विचारणा केली. त्यानंतर सावे यांनीही जोरदार विरोध करत जी व्यक्ती सभागृहात नाही तिच्यावर आरोप कसा करता, असा सवाल करत बैठकीत याची नोंद घेऊ नका, अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कुठलाही उल्लेख येणार नाही असे सांगितले. जलील यांच्या मध्य मतदारसंघात एक लाख अवैध नळ कनेक्शन असल्याचा आरोप केणेकर यांनी केला. तेव्हा अवैध नळधारकांवर कारवाई करा, असे जलील म्हणाले.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहराच्या पाण्याची स्थिती मांडली. शहरात टाक्यांची कमतरता आहे. कार्यकारी अभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे ते म्हणाले.
मजीप्रमार्फत फारोळ्यापर्यंत पाइपलाइन आणा
सध्या शहरात चार दिवसांनी पाणी येते. जायकवाडीला पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन चाळीस वर्षे जुनी आहे. तेव्हाच्या तुलनेत आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पाणीपुरवठा योजना समांतरकडून पूर्ण होत नसेल तर किमान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून फारोळा पर्यंत पाइपलाइन आणा, अशी मागणी आ. सावे यांनी केली.
पुलांसाठी निधी द्या
या बैठकीत नगरसेवक सचिन खैरे यांनी मकई गेटचा पूल पडत असून त्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर जलील यांनी बारापुल्ला गेट आणि मेहमूद दरवाजासाठीदेखील निधी देण्याची मागणी केली. पूल पडल्यानंतर जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.