आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-एनडीए खासदारांनी मोदींची केली नेतेपदी निवड, राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप व एनडीएच्या संसदीय पक्षाने शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली. यानंतर सुमारे सव्वा तासाच्या भाषणात मोदींनी “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा नवा मंत्र दिला. ते म्हणाले, “व्होट बँकेच्या राजकारणात गरिबांसारखेच अल्पसंख्याकांशीही कपट केले गेले. त्यांना काल्पनिक भयाच्या वातावरणात ठेवून त्यांचा छळ केला गेला. भीती दाखवून निवडणुकीत त्यांचा वापर केला गेला. हे कपट आम्हाला भेदायचे आहे. पंथ व जातीच्या आधारे कुणावरही अन्याय नको. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हाच आमचा मंत्र आहे.’ नेतेपदी निवड झाल्यावर मोदींनी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल केला. ३० मे रोजी शपथविधी होऊ शकतो. 

 

जनादेशाबाबत : जनादेशाचे पालन करताना त्यांचा सन्मान केला पाहिजे
निवडणूक मी नव्हे, जनतेने लढली. हा सकारात्मक विचारांचा जनादेश आहे. जनता ईश्वराचे रूप असते. मी स्वत: ते अनुभवले आहे. साधारणपणे निवडणूक आली की काही लोकांना कामाला लावायचे अशी धारणा होती. ५ वर्षांनंतर पुन्हा नवीन कुणीतरी निवडून यायचे. या वेळी देशच भागीदार ठरला. २०१४ ते २०१९ पर्यंत आम्हाला सत्ता दिली.


जनतेसाठी : स्वच्छतेच्या अनुषंगाने समृद्ध भारतासाठी जनआंदोलन उभारा 
२०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होतील. २०१९ मध्ये गांधीजींची १५० जयंती आहे. या काळात आपण हक्कांपेक्षा कर्तव्यावर भर द्यावा. हिंदुस्तानी माणसाने संकल्प करावा. सामान्यांना सोबत घेऊन स्वच्छतेचे आंदोलन छेडले तर समृद्ध भारत पण जनआंदोलन ठरेल. सरकार काही ना काही करते. आम्ही खूप काही करणार आहोत.


आघाडीसाठी: एनडीए आंदोलन ठरले, ते अधिक सक्षम करावयाचे आहे... 
एनडीए आंदोलन ठरले आहे. ते अधिक सक्षम करावयाचे आहे. एनडीएच्या सर्व सहकाऱ्यांनी मला नेता निवडले. मी तुमच्यासोबत आहे. काही चूक झाली तर एक शिर असे असले पाहिजे, ज्याने ती जखम झेलावी, उर्वरित खांदे भक्कमच राहिले पाहिजेत.  ती जखम मी झेलेन.

 

खासदारांसाठी : डामडौल नको; संयम ठेवा, देश माफ करणार नाही...

> सत्तेचा तोरा मतदारांवर प्रभाव टाकू शकत नाही. याचा कुणी फार सन्मानही करत नाही. सेवाभाव मात्र कुणीही नतमस्तक होऊन स्वीकारतो. जेवढा आमचा सेवाभाव प्रबळ असेल, तेवढा सत्तेचा तोरा कमी होईल, जनतेचे आशीर्वादही वाढतील. लोकप्रतिनिधींनी मने जिंकण्याचा प्रयत्न करावा.


> डामडौलापासून दूर राहायला हवे. कुणी विचारले, “आम्ही अमुक गोष्ट ऐकली, तुमचे मत काय?’ त्यांना सांगा... मला माहिती करून घेऊ द्या. अन्यथा तुम्ही काहीतरी सांगाल आणि त्यावरून वाद होईल. मूळ मुद्दा बाजूला राहील. सर्व सहकाऱ्यांनी यापासून दूर राहावे. आता हा देश माफ करणार नाही. वाणी सांभाळा.

 

यशाबाबत...
मोदीने मोदीलाच आव्हान देत विक्रम मोडले
> २०१९ मध्ये भाजपला २०१४ पेक्षा २५% अधिक मते पडली. जगाचा विचार करता, अमेरिकेच्या अध्यक्षांना जेवढी मते पडली तेवढे तर आमचे इन्क्रिमेंट आहे.


> ४०-४५ अंश तापमानात लोक मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिले याचे परदेशी नेत्यांना आश्चर्य वाटते.  विशेष म्हणजे या वेळी महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले.


> मला विचारले गेले की, तुमचे चॅलेंजर कोण आहेत? मी म्हणालो, मोदीच मोदीचा चॅलेंजर आहे. आज मोदीने २०१४ चे विक्रम मोडले आहेत.


> २०१४ मध्ये वाटले होते महिला खासदार वाढल्या. यंदा तो विक्रमही मोडला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या महिला संसदेत असतील.