आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; मुंबईत देणार पाच नवे चेहरे, काहींना डच्चू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेसाठी भाजपने महायुतीचे मिशन २२० पार हाती घेतले असून संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत ४-५ ठिकाणी नवे चेहरे दिले जाणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा असून २०१४ मध्ये भाजप-शिवसेना वेगळे लढले होते. भाजपने १५, शिवसेनेने १४, काँग्रेसने ५ आणि सपा व एमआयएमने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.  यंदा भाजप-शिवसेना युती असून विद्यमान जागा असणाऱ्या पक्षाकडेच त्या ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, गोरेगावची जागा शिवसेनेची असून गेल्यावेळीच तेथे भाजपच्या विद्या ठाकूर सुभाष देसाईंचा पराभव करून आमदार झाल्या. वर्सोवा येथेही शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला होता. राज्यातही काही ठिकाणी  अशा जागांबाबत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.  गेल्या वेळी जिंकलेल्या १५ जागांपैकी ४ ते ५ जागांवर विद्यमान आमदारांना डच्चू   मिळू शकतोे. यापैकी वर्सोवा येथील आमदार भारती लव्हेकर, मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग, गोरेगावच्या आमदार व राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना डच्चू दिला जाणार असल्याचे समजते. काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर लवकरच भाजपत प्रवेश करणार असून त्यांनाही भाजपकडून तिकीट दिले जाणार आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेनाही दावा करणार  आहे.

 

आशिष शेलारांच्या बंधू, सोमय्यांच्या मुलाला तिकीट
किरीट सोमय्यांना खासदारकीचे तिकीट नाकारल्याची भरपाई म्हणून सध्या नगरसेवक असलेले त्यांचे पुत्र नील यांना आमदारकीचे तिकीट दिले जाऊ शकते. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार आणि काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केलेल्या प्रवीण छेडा यांनाही तिकीट दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.