आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गापूजेला विराेध केल्यास प्रत्युत्तर, कोलकात्यात भाजपाध्यक्षांचा ममतांना इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी कोलकात्यात सभा घेतली. दुर्गापूजा वा सरस्वती पूजा रोखली तर भाजप कार्यकर्ते तडाखेबाज प्रत्युत्तर देतील, असा इशारा त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला.


शहा म्हणाले, बंगालमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी हिंदू सणांत अडचणी आणणे चूक आहे. दीदी, तुम्ही हिंदूंना दुर्गापूजा विसर्जन, सरस्वती पूजा करू दिली नाही. पुढच्या वेळी असे केले तर भाजप कार्यकर्ते सचिवालयापर्यंत मोर्चा काढून तुम्हाला प्रत्युत्तर देतील.  तृणमूल व राहुल यांनी कितीही विरोध केला तरी एनआरसी थांबणार नाही. ते घुसखोरांना का राहू देऊ इच्छितात? व्होट बँक महत्त्वाची आहे की देश? आसाममध्ये एनआरसीद्वारे प्रत्येक घुसखोराला हाकलले जाईल. बंगालमध्ये २०१९ च्या निवडणुकीत घुसखोर हाच प्रमुख मुद्दा असेल.

 

रवींद्र संगीत निनादणाऱ्या बंगालमध्ये स्फोटांचे धमाके
शहा म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये जेव्हापासून ममतांचे सरकार आले आहे तेव्हापासून चोहीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीताचे स्वर निनादत होते तेथे आज बॉम्बस्फोट होत आहेत. कारखाने बंद पडत आहेत आणि बॉम्ब बनवण्याचे कारखाने उघडत आहेत.

 

भाजपसाठी आधी देश,  नंतर येते व्होट बँक

शहा म्हणाले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. आमच्यासाठी देश सर्वोच्च आहे. व्होट बँक नंतर येते. एकेकाळी बांगलादेशी घुसखोर कम्युनिस्टांची व्होटबँक होते. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी संसदेत प्रचंड गदारोळ करून बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवण्याची मागणी लावून धरली होती. मात्र आता हेच घुसखोर तृणमूलची व्होट बँक बनल्याचा आरोप शहा यांनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...