आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय घडामोडी :भाजपकडून २३ मेच्या उत्सवाची तयारी, भाजप कार्यालयात २३ मे रोजी ४० टीव्ही चॅनल्ससाठी केबिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, लखनऊ, कोलकाता - एक्झिट पोलच्या निकालाने नवा उत्साह संचारलेल्या भाजपने आपल्या मुख्यालयात २३ मे रोजी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विजय गोयल आणि संघटन महामंत्री रामलाल यांनी सोमवारी या तयारीसाठी बैठक घेतली. खाण्यापिण्यापासून निकालाच्या दिवशी सुमारे ४० टीव्ही चॅनल्ससाठी वेगवेगळ्या केबिन बनवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, त्रिशंकू लोकसभेच्या अपेक्षेत असलेले विरोधक भाजपला संधी न मिळण्याची तयारी करत आहेत. प्रादेशिक पक्षांच्या मनधरणीसाठी काँग्रेसने पाच नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. कमलनाथ, अशोक गेहलोत, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम या कामी गुंतले आहेत. वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस हे भाजपपासून दूर राहील यासाठी काँग्रेस मिशन साऊथवर नायडू यांनी सोमवारी ममता बॅर्नजी यांची भेट घेतली. मायावती आणि अखिलेश यादव यांनी लखनऊ येथे दीड तास बैठक घेतली. सूत्रांनुसार, सत्तेची चावी महाआघाडीच्या हाती आली तर मायावती पंतप्रधानपदाच्या उमेदवार असतील, हे सपा-बसपा-रालोदने स्पष्ट केले.

 

काँग्रेसने ५ नेत्यांवर सोपवली वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी
> आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी आणि तामिळनाडूत डीएमके नेते एम.के. स्टॅलिन यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


> ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी चर्चेची जबाबदारी कमलनाथ यांच्याकडे देण्यात आली आहे. रेड्डी आणि केसीआर यांच्याशी चर्चेसाठी काँग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची नावे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांच्याशी गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल चर्चा करतील. हे दोन नेते एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांच्याही संपर्कात राहतील.


> यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घटक पक्ष आणि सहकारी पक्षांच्या नेत्यांबरोबर २४ मे रोजी बैठक आयोजित केली आहे. यात निकालानंतर तयार होणाऱ्या राजकीय स्थितीबाबत चर्चा होईल. 

 

मतमोजणी नि:पक्ष व्हावी : भाजपने विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांत मतमोजणीत घोटाळ्याची शंका व्यक्त केली आहे. प. बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील ईव्हीएमची सुरक्षा व्यवस्था कडक करावी. मतमोजणी पारदर्शक आणि सुरक्षितपणे व्हावी. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त तसेच इतर आयुक्तांची भेट घेतली.

 

५० % व्हीव्हीपॅट मोजणी, आज आयोगाची भेट घेणार विरोधी पक्ष
ईव्हीएम डेटा आणि व्हीव्हीपॅट मतपत्रिकांच्या जोडणीच्या मागणीवरून विरोधी पक्ष मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतील. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅट पत्रिकांची जुळणी ईव्हीएम डेटाशी करण्याची व्यवस्था केली होती. टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मतपत्रिकांची मोजणी करता येत नसेल तर आयोगाने नऊ हजार कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय होती? मतमोजणी वेगाने होण्यापेक्षा विश्वासार्हता महत्त्वाची आहे, तर काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले, एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर ईव्हीएममध्ये घोटाळा झाला हे उघड आहे. माकप नेते सीताराम येचुरी म्हणाले, जुळणी झाली नाही तर काय, हे निवडणूक आयोग अद्याप निश्चित करू शकलेला नाही. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, वेगवेगळी मते असतील तर निवडणूक रद्द व्हायला हवी.