आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष-अंतरामुळे उदंड झाले बंड!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अबकी बार... २२० पार’ अशी घाेषणा करुन विजयाच्या अविर्भावात वावरणाऱ्या भाजप- सेनेसमाेर उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर बंडखाेरीचे माेठे संकट उभे राहिले आहे. सत्तेच्या आशेने युतीत काॅंग्रेस- राष्ट्रवादीतील नेत्यांची भाऊगर्दी झाली. त्यातच युतीच्या जागावाटपानेही वांदे केले. जाे मतदारसंघ भाजपला सुटला तिथे शिवसैनिक तर जाे मतदारसंघ शिवसेनेला सुटला तेथील भाजप कार्यकर्ते नाराज झाले. परिणामी आता दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांपासून ते अनेक उमेदवारांना बंडाळीला सामाेरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. सत्तेचा घास समाेर असताना बंडाळीला कसे सामाेरे जावे, असा प्रश्न युतीसमाेर आहे.

जळगाव : वाघ दांपत्याकडून बंडाचा पवित्रा
जळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघही अमळनेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. आमदार उन्मेष पाटील हे खासदार झाल्यामुळे आता त्यांच्या जागी उमेदवारीसाठी वाघ दांपत्याने जाेरदार प्रयत्न केले हाेते, मात्र पक्षाने शिरीष चौधरी यांच्या गळ्यात माळ टाकली. त्यामुळे ‘बाहेरील’ उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका वाघ समर्थकांनी घेतली आहे.विशेष म्हणजे उन्मेष पाटील यांनीही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले हाेते. धुळ्याची जागा शिवसेनेला सुटून हिलाल माळी यांची उमेदवारी जाहीर हाेताच भाजपच्या डाॅ. माधुरी बाेरसे यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर माजी आमदार शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बंडाचा झेंडा हाती घेतला.

नाशिक : शिवसेना-भाजपमध्येच द्वंद
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारुन त्यांच्या जागे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल ढिकले यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे सानप समर्थका राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या नावाला विराेध असूनही त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे मनसेतून भाजपात आलेले वसंत गिते ‘वेगळा’ विचार करत आहेत. नाशिक पश्चिममध्ये भाजप आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विराेध आहे. ही जागा शिवसेनेला हवी. या पक्षाच्या २२ नगरसेवकांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. देवळालीत शिवसेनेचे आमदार याेगेश घाेलप यांच्याविराेधात भाजपा नगरसेविका सराेज अहिरे यांनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीची वाट धरली. 

नागपूर : काेहळे समर्थकांकडून निदर्शने
नागपूर दक्षिणचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकिट कापून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या वेळी मते यांनी बंडखाेरी केली तरीही त्यांना तिकिट दिल्यामुळे काेहळे समर्थकांत नाराजी आहे. त्यांनी भाजप विराेधात निदर्शने केली. मध्य नागपूरमधून आमदार विकास कुंभारेंना पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे माजी महापाैर प्रवीण दटके यांची निराशा झाली. त्यांच्या समर्थकांनी ‘भाजपामध्ये जातीचे राजकारण कधीपर्यत चालेल?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला आहे.

यवतमाळ : राजू ताेडसाम अपक्ष लढणार
भाजपचे वादग्रस्त आमदार राजू ताेडसाम यांची उमेदवारी कट करुन पक्षाने संदीप धुर्वे यांनी तिकीट दिले आहे. त्यामुळे ताेडसाम हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. बुलडाण्यात शिवसेनेने संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. राज्य कार्यकारिणी सदस्य याेगेंद्र गाेडे व इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

बीड : पंडीत, जगतापांची थाेपटले दंड
गेवराईची जागा भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनाच कायम राहिली. मात्र राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी मंत्री बदामराव पंडित त्यामुळे नाराज झाले आहेत. ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. माजलगावमध्ये भाजपने विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांचे तिकीट रमेश आडसकर यांना संधी दिली. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माेहन जगताप नाराज झाले, त्यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.  

नांदेड : सेना उमेदवारांविराेधात भाजपचे बंड
हदगावात सेनेने आमदार नागेश पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्याविराेधात माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांच्या समर्थकांनी निवघा सर्कलमध्ये मंगळवारी बंद पाळला. दक्षिण नांदेडमध्ये शिवसेनेने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला हाेता. त्यासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी गुरुवारी बैठक बोलावली आहे. 

लोहा- कंधार : चिखलीकरांची वेगळी वाट
शिवसेना आमदार असलेले प्रताप चिखलीकर भाजपकडून खासदार झाले आहेत. ही जागा शिवसेनेसाठीच कायम राहिल्याने चिखलीकर समर्थकांत राेष आहे. या भागात चिखलीकरांचे वर्चस्व असल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

पुणे : चंद्रकांत पाटील यांना वाढता विराेध
विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकिट कापून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काेथरुडमधून उमेदवारी जाहीर केली. मेधा यांनी या उमेदवारीबाबत जाहीर तक्रार केली नसली तरी त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. ‘बाहेरील’ उमेदवार चालणार नाही, असा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे. जुन्नरमध्ये मनसेचे आमदार शरद साेनवणे आता शिवसेनेत आले असून पक्षाने त्यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे इच्छूक शिवसेनेच्या जि.प. सदस्या आशा बुचके यांनी बंडखाेरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. मनसेची उमेदवारी मिळवण्यासाठीही त्यांचे प्रयत्न आहेत.  मावळमध्ये भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे  यांच्याविराेधात भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. 

बार्शी : साेपल यांना भाजपमधून विराेध

​​​​​​राष्ट्रवादीतून आलेल्या दिलीप साेपल यांना शिवसेनेने बार्शीतून उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते तथा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राजा राऊत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. बार्शीत आजवर सोपल विरुध्द राऊत अशीच लढत झालेली आहे.
 

भाजपला इशारा : नाथाभाऊंना दगा दिला तर याद राखा !
भुसावळ - ४० वर्षांपासून लेवा पाटीदार समाज भाजपसोबत आहे. मात्र समाजाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर तीन वर्षांपासून भाजप अन्याय करीत आहे. उमेदवारीबाबत पक्षाने दगा दिल्यास वेगळा विचार करु, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतच्या कुटुंबनायकांनी भाजपला दिला आहे.
 

खडसे, तुम्ही आता बोलू नका
भोरगाव लेवा पंचायतीने पत्रकार परिषद घेण्यापूर्वी माजी मंत्री खडसेंसोबत मोबाईलद्वारे संवाद साधला. आपली उमेदवारी समाजाला हवी आहे, यामुळे या प्रश्नी आता समाज मागणी करीत आहे, यात आपण आता मध्ये बोलू नका. उमेदवारी न मिळाल्यास पुढील योग्य निर्णय पंच मंडळी घेतील, असे आम्ही आता खडसेंनाच सांगितले आहे, असे रमेश पाटील यांनी सांगितले.

काय म्हटले कुटूंबनायक
> ​​​​​​​लेवा समाजात खडसेंना जो सन्मान आहे, तो त्यांच्या कन्या राेहिणी यांना अद्याप नाही. त्यामुळे आम्हाला खडसेच उमेदवार हवेत.
> उमेदवारी कापली तरी लेवा पाटीदार खडसेंसोबतच राहतील.
> दुसऱ्या यादीत  खडसेंना उमेदवारी न मिळाल्यास आम्ही पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करु.

बातम्या आणखी आहेत...