आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणात भाजपने ८ दिवसांवर मतदान असताना जाहीरनामा केला जारी; सर्व जिल्ह्यांत आधुनिक रुग्णालये सुरू करू; भाजपने दिली ग्वाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी जाहीरनामा जारी केला. त्यात महिला, शेतकरी, तरुण व आरोग्य सेवांवर भर देण्यात आला आहे. भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात तरुणांचा विकास व स्वयंरोजगार मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले. 

जाहीरनामा जारी करताना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते. नड्डा म्हणाले, समाजातील प्रत्येक वर्गाचा विचार करून संकल्पपत्र तयार केले आहे. काँग्रेसने भाजपसारखेच जाहीरनाम्याचे नाव संकल्पपत्र ठेवले आहे. त्याची नड्डा यांनी खिल्ली उडवली. केवळ जाहीरनाम्याचे नाव बदलून सरकार बदलत नसते, असा टोला त्यांनी लगावला. 
 
 

भाजप-काँग्रेस : दोन्ही पक्षांचा महिला, शेतकरी, तरुण, आरोग्यावर भर
 

भाजप : शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज, निवृत्तिवेतनही
महिला : १.८० लाख रुपये वार्षिक उत्पन्न गटातील कुटुंबाच्या दोन मुलींना शिक्षण मोफत. सरकार विभागातील अस्थायी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा. 
शेतकरी : तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज. पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या १४ लाख शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचे मासिक निवृत्तिवेतन
तरुण : सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून २५ लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण देऊ. राज्यात १००० क्रीडा नर्सरी स्थापन करू. 
आरोग्य : सर्व २२ जिल्ह्यांत नवीन आधुनिक रुग्णालये सुरू करू. त्याशिवाय २ हजार आरोग्य केंद्र स्थापन करू. हरियाणाला टीबी व अॅनिमियामुक्त करणार. 
 
 

काँग्रेस : सरकार येताच २४ तासांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, भरपाई करू 
महिला: महिलांना सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण. विधवा, घटस्फोटित महिलांना ५१०० रुपये मासिक निवृत्तिवेतन. गरोदर महिलांना ३५०० रुपये मासिक भत्ता. 
शेतकरी : सरकार आल्यावर चोवीस तासांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नैसर्गिक संकटामुळे पिकांची हानी झाल्यास प्रतिएकर १२ हजार रुपये भरपाई. 
तरुण : बेरोजगार पदवीधारकांना ७ हजार रुपये व पदव्युत्तर पदवीधारकांना १० हजार रुपये मासिक भत्ता. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू. 
आरोग्य: प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय. नशामुक्ती केंद्र सुरू करू. प्रत्येक गरिबाला मोफत उपचार व आरोग्य कार्ड मिळेल.