आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन फुटणार शिवसेना-भाजप प्रचाराचा नारळ, एकदिलाने प्रचार करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना-भाजप युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ 24 मार्च रोजी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन फुटणार आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी 11 एप्रिलला मतदान होणार असल्याने राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनीती आखली आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या तरी शिवसेना-भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. युती जाहीर झाल्यापासून जागावाटप नक्की झाल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीबाबत अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

 

जागावाटपाबाबत आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 जागांवर, तर भाजप 25 जागांवर निवडणूक लढणार आहे. काही जागांवरून युतीत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी दाेघांत चर्चा झाली.

 

यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. ता 15, 17 आणि 18 मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे.

 

औरंगाबादला 17 रोजी युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा  
भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा (दि.15 मार्च) रोजी दुपारी अमरावतीला होणार असून दुसरा पदाधिकारी मेळावा (दि.15) नागपूरला होणार आहे. तिसरा मेळावा (दि.17) रोजी औरंगाबादला होणार आहे. याच दिवशी चौथा मेळावा (दि.17) नाशिकला होणार आहे. पाचवा मेळावा (दि.18) नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा (18) पुण्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...