वाग्बाण / भाजप-शिवसेनेचे ‘गर्लफ्रेंड’सारखे नाते; जमतही नाही, सोडतही नाही - आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांची टीका

दिल्लीत विकसनशील गोष्टी शक्य तर राज्यात का नाही? - मेनन यांचा सवाल
 

दिव्य मराठी

Oct 08,2019 05:05:00 AM IST

सचिन काटे

मुंबई - ‘शिवसेना आणि भाजपमधील संबंध हे एखाद्याच्या ‘गर्लफ्रेंड’सारखे आहेत. ज्यांचे एकमेकांशी जमतही नाही आणि ते एकमेकांना सोडतही नाहीत. अनेक मुद्द्यांवर त्यांचे मतभेद आहेत, पण तरी ते एकत्र आहेत. भावनिक राजकारण करत हेतू साध्य करणे हा त्यांचा ‘अजेंडा’ आहे,’ अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली.


मेनन म्हणाल्या, ‘आपने राज्यात ३० उमेदवार उभे केले आहेत. आमच्याकडे सुमारे ५०० इच्छुकांचे अर्ज आले, मात्र निकषात बसणाऱ्या काही सर्वसामान्य उमेदवारांनाच आम्ही तिकीट दिले. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आम्ही लढतोय. राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही. शेतकरी, मराठा मोर्चा, शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील लाेकांंमध्ये सरकारबाबत राेष आहे. मात्र त्यांचा आवाज उठवण्यासाठी राज्यात सक्षम विराेधी पक्ष नाही. त्यामुळे जनतेचा पर्याय उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा एक जरी आमदार विधानसभेत पोहोचला तर तो सगळ्यांना भारी पडेल.’

दिल्लीत शक्य, राज्यात का नाही?

‘दिल्लीत ‘आप’ सरकारने अनेक गोष्टी करून दाखवल्यात. दिल्लीत एक युनिटही वीज तयार हाेत नाही, पण आम्ही तेथे काही प्रमाणात मोफत वीज उपलब्ध करून दिली. प्रत्येकाला पाणी दिले, शिक्षणात आमूलाग्र बदल केले. तेथे होऊ शकते तर इथे का नाही? राज्यात सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चांगले लोक निवडणुकीला उभे राहायला घाबरतात, मात्र फार काळ असे वातावरण चालू शकत नाही,’ याकडेही मेनन यांनी लक्ष वेधले.

सहकारातून जहागीरदारी

मेनन म्हणाल्या, ‘शिखर बँक, जिल्हा बँकेत घोटाळे आहेतच. यात इतरांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या मोठी आहे. साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांद्वारे ते जहागीरदार झाले आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे सहकाराचे स्वप्न अगदी धुळीस मिळवलेय.’

X
COMMENT