आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पुन्हा युतीला सत्तेचा बहुमान : फडणवीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘मी पुन्हा येईन’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टॅगलाइन भलतीच गाजत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नागपुरातील आपल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करत ‘मी परत येणार’ असा संदेश दिला. ते म्हणाले, ‘राज्यात महायुतीला कधी नव्हे एवढे एक तृतीयांश बहुमत मिळणार असून विजयाचा जल्लोष करण्यासाठी निकालाच्या दिवशी नागपुरात येईन. राज्यात प्रचार करायचा असल्याने मी मतदारसंघात प्रचाराला फार वेळ देऊ शकलो नाही. माझ्या अनुपस्थितीत दक्षिण-पश्चिम नागपुरात तुम्ही प्रचाराची खिंड लढवली. आता मतदानाच्या दिवशी तुम्हाला युद्ध लढायचे आहे. जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करायचे आहेत,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी फडणवीस यांनी रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. शिवाजी चौकात रोड शोचा समारोप झाला. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रिपब्लिकन नेत्या सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार या नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने रोड शोमध्ये सहभागी झाले होते. मल्लखांब पथक, लेझीम पथक तसेच बँड पथकही सहभागी होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी रोड शोच्या मार्गात रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी चौकात रोड शोची समाप्ती झाल्यावर उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मतदानाच्या दिवशीच्या लढाईला सज्ज होण्याचे आवाहन केले. 

‘पाच वर्षांत युती सरकारने राज्यात पारदर्शी कारभार केला. प्रत्येक समाजासाठी काम करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. गडकरींच्या नेतृत्वात विदर्भाचे चित्र बदलले. मतदानाचा दिवस युद्धासारखा आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदानात सहभागी व्हा व दुसऱ्यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.
 

इतिहास घडवण्यासाठी सज्ज व्हा : काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख
फडणवीस यांच्याविरुद्ध रिंगणात असलेले काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनीही रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. दीक्षाभूमीवर अभिवादन करून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा नीरी कॉलनी, रहाटे चौक, धंतोली, जाटतरोडी, शताब्दी चौक, मनीषनगर असा प्रवास राहिला. या वेळी आशिष देशमुख यांनी मतदारसंघात इतिहास घडवण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...