आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने स्मृती इराणींकडे दिली मोठी जबाबदारी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत घेणार सर्वाधिक प्रचार सभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडे भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. त्या या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सर्वात जास्त सभा घेणार आहेत. भाजपच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये सर्वात तरुण आणि तडफदार नेत्या आहेत. माजी अभिनेत्री राहिलेल्या स्मृती आपल्या ग्लॅमरमुळे भाजपच्या स्टार प्रचारक ठरू शकतात. आपल्या भाषणांमुळे त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय आहेत. विरोधकांवर ज्या पद्धतीने त्या टीका करतात त्या शैलीमुळे भाजपने या निवडणुकीत त्यांना पसंती दिली आहे. यापूर्वी भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत खासदार आणि माजी अभिनेते मनोज तिवारी यांना महत्वाची जबाबदारी दिली होती.

वृत्तसंस्थेशी संवाद साधताना एका भाजप नेत्याने सांगितले, की "स्मृती इराणी यांचा जन्म दिल्लीतच झाला आहे. त्यांचे शिक्षण आणि बालपण सुद्धा दिल्लीतच गेले. त्या मूळच्या पंजाबी असून त्यांच्या आई ह्या बंगाली आहेत. त्यांनी भाजपकडून 2004 च्या लोकसभा निवडणुकीत चांदणी चौक मतदार संघातून निवडणूक लढवली होती. दिल्लीत त्यांना मोठा समर्थकांचा गट आहे. या सर्वच गोष्टी लक्षात घेऊन भाजपने त्यांना दिल्ली निवडणुकीत सर्वाधिक सभा घेण्यासाठी निवडले यात शंका नाही."

दुसऱ्या एका भाजप नेत्याने सांगितल्याप्रमाणे, स्मृती इराणींच्या याच वैशिष्ट्यांमुळे त्यांना 4 जानेवारी रोजी 'मेरी दिल्ली मेरा सुझाव' या भाजपच्या प्रचार कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठीत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केले होते. दोन ठिकाणांवरून निवडणूक लढवणारे राहुल यांनी वायनाड येथून लोकसभेची जागा जिंकली होती. राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींचे पक्षातील वजन वाढले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र, झारखंडमध्ये सुद्धा भाजपचा प्रचार केला. भाजप लवकरच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करणार आहे. त्यामध्ये स्मृती इराणींचे नाव सर्वात महत्वाचे राहील असेही भाजपमधील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...