आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप Vs काँग्रेस : पंज्याने तिजोरी लुटली : मोदी, भाजपने हक्क दडपला : राहुल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर / पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमध्ये भाजपवर वार केले. मोदींनी जनतेच्या समर्थनाला सव्याज परत करू, अशी ग्वाही दिली, तर राहुल यांनी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देऊन टाकली. 


मोदी म्हणाले, संपुआ सरकारच्या कार्यकाळात ३० ते ३५ लाख लोकांचे कर्ज माफ करण्यात आले होते. वास्तविक या लोकांना कर्ज घेण्याचा कसलाही हक्क नव्हता. दुसरीकडे मोदींनी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये दिल्याचा आराेप राहुल यांनी केला. मात्र, गरिबांना १७ रुपये देऊन त्यांची बोळवण केली, अशी टीका राहुल यांनी केली.

 

मोदींच्या हस्ते रविवारी लेहमधील लडाख विद्यापीठ व विमानतळाच्या टर्मिनलच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. माेदींनी या कार्यक्रमातून भाजपला मतदान करण्याचे आवाहनदेखील केले. त्याचबरोबर येथील विविध प्रकल्पांच्या लोकार्पणाचीदेखील इच्छा व्यक्त केली. बिहारच्या दौऱ्यावर असलेले राहुल यांनी बिहारचा शिक्षणाची भूमी असा गौरव केला. त्याचबरोबर पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याचे आश्वासनही राहुल यांनी दिले. 

 

पंतप्रधानांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या निमित्ताने राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली होती. मोबाइल-इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता. काँग्रेसने पाटण्यात २८ वर्षांनंतर जाहीर सभा घेतली. 

जम्मू-काश्मीरमधील जनतेचे प्रेम सव्याज परत करणार 


पंतप्रधानांचे लेह विद्यापीठात मार्गदर्शन 
पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी जम्मू-काश्मीरच्या लेह येथील लडाख विद्यापीठ व विमानतळ समारंभात सहभागी झाले होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरच्या जनतेचे प्रेम सव्याज परत करणार आहे. प्रकल्प रखडवण्याची परंपरा मोडीत काढून लोकार्पणासही मीच येईल. लेह-लडाख व कारगिलच्या विकासात सरकार काहीही कमी पडू देणार नाही. संपुआच्या काळात रिमोट होता. तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली. मात्र, तेव्हा देशातील शेतकऱ्यांवर ६ लाख कोटींचे कर्ज होते. निवडणूक जिंकणाऱ्या संपुआ सरकारने केवळ ५२ हजार कोटी रुपये माफ केले. शेतकऱ्यांची फसवणूक केली. सीएजीच्या तपासात ३०-३५ लाख कर्जासाठी अपात्र असल्याचे स्पष्ट झाले. अखेर तो कोणता पंजा होता? त्यानेच तिजोरी रिकामी केली. रालोआने मात्र देशभरात मुलांचे शिक्षण, तरुणांना राेजगार, ज्येष्ठांना आैषधी, शेतकऱ्यांना सिंचनाची सूत्री अवलंबली असल्याचा दावा मोदींनी केला. 

 

पाकमधील पीडितांना भारत 
भक्कम पाठिंबा देईल : मोदी 

मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारचे कर्तारपूरकडे लक्ष गेले असते तर गुरुनानक देवांची भूमी भारताचा भाग असती. पाक-बांगलादेशमध्ये आपले लाखो बंधू-भगिनी आहेत. ते पीडित आहेत. त्यांच्या पाठीशी भारत राहील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. म्हणूनच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणले आहे. काश्मिरी पंडितांवरील अन्याय देश कधीही विसरणार नाही. देशातील जनता या गोष्टींना अद्यापही विसरू शकलेली नाही. 

 

राहुल यांची पाटण्यात सभा घेतली 
पाटण्यात गांधी मैदानावर राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर चाैफेर टीका केली. राहुल म्हणाले, मोदींनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये, तर शेतकऱ्यांना केवळ १७ रुपये दिले. शेतकऱ्यांना काही तरी मोठे देत असल्याचा आव आणणाऱ्या मोदींनी या घोषणेवर टाळ्याही मिळवल्या. भाजपने १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र, आम्ही सत्तेवर आल्यास प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्नाची हमी देऊ. काँग्रेस सत्तेवर आल्यास पाटण्यातील विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देऊ, असे राहुल यांनी सांगितले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी आणली. तुम्हाला रांगेत उभे केले. खरे तर गरिबांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम या सरकारने केले व हेच पैसे श्रीमंतांना दिल्याचा आरोप राहुल यांनी केला. जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे नोटबंदी आहे. पूर्वी मोदी 'अच्छे दिन' म्हणत तेव्हा जनता 'येतील', असा रुकार देत होती. मात्र, आता घोषणा बदलली आहे. कारण देशाचा चौकीदार चोर आहे. 

 

राहुल पीएम पदासाठी योग्य, 
मोदी खोट्याची फॅक्ट्री : तेजस्वी 

राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची योग्यता आहे. मोठा पक्ष असल्याने काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांना जोडले पाहिजे. मोदी मात्र खोटे बोलण्याची फॅक्ट्री आहे, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. मोदींनी बिहार सापत्न वागणूक दिली आहे. मोदींनी सत्तेवर आल्यापासून सातत्याने आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ते खोटे आहेत, असे तेजस्वी यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...