आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर/ नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त कधीही जाहीर होऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने देशपातळीवर आणि राज्यांतही जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रात पक्षाच्या जाहीरनामा समितीसह १७ समित्यांची घोषणा करून भाजपने निवडणुकीची पूर्ण शक्तिनिशी तयारी सुरू केली. तर, दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला थेट इशारे दिले. राज्यात सरकारी योजनांचे २ कोटी लाभार्थी आहेत. त्यामुळे युती होवो अथवा न होवो, 'मॅन टू मॅन' आणि 'होम टू होम कॉन्टॅक्ट' मोहीम राबवा आणि एकहाती सत्ता आणा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर अमित शहा यांनी आणखी स्पष्ट इशारा देत 'कुणी मित्र सोबत आले तर ठीकच. अन्यथा विरोधकांसह त्यांच्यावरही मात करू', असा सज्जड इशारा शिवसेनेचे नाव न घेता दिला. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
मित्र सोबत आले तर ठीकच, अन्यथा त्यांच्यावरही मात करू
आगामी लोकसभा निवडणूक पानिपतच्या लढाईसारखीच आहे. हे युद्ध मात्र भाजप कोणत्याही परिस्थिती जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बूथ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न रविवारी केला. लातूरमध्ये आयोजित लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली चार जिल्ह्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना शहा यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. 'कुणी मित्र सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांच्यावरही मात करू,' असे शहा म्हणाले.
वाचाल तर वाचाल!
नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर अमित शहांच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी ५५ मिनिटे ताटकळत बसावे लागले. हा वेळ मुख्यमंत्र्यांनी पुस्तक, अल्बम आणि मोबाइल पाहण्यात घालवला.
स्वबळावर लढले तरी राज्यात २३ जागांवर यश : भाजपचा दावा
स्वबळावर लढल्यास २०१४ प्रमाणेच लाेकसभेच्या २३ जागा मिळू शकतील, असा भाजपच्या सर्व्हेचा अंदाज आहे. पाच राज्यांतील निवडणुकीपूर्वी हा सर्व्हे झाला. २०१४ मध्ये युतीत भाजपला २३ व सेनेला १८ जागा हाेत्या. या वेळी एकूण ३० ते ३४ जागाच मिळू शकतील असा अंदाज आहे. म्हणजे आपल्या जागा कायम राहून शिवसेनेच्या जागा घटतील, असे भाजपला वाटते. दरम्यान, एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार युती झाल्यास भाजप-शिवसेनेला ३४ जागा मिळतील तर आघाडीला १४. मात्र वेगळे लढल्यास भाजप व मित्रपक्षाला २३, काँग्रेस मित्रपक्ष १४, राष्ट्रवादी ६ आणि शिवसेना ५ जागांवर विजय मिळवू शकेल.
भाजपच्या भूमिकेचा पर्दाफाश, एकदाचे हाेऊनच जाऊ द्या : शिवसेनेचे प्रत्युत्तर
भाजपने स्वबळाचा इशारा देताच शिवसेनेने पलटवार केला. 'शहा यांच्या मस्तवाल व उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि भाजपचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदूंच्या मनातील भावना मांडून अयाेध्येत राममंदिराचा नारा दिला हाेता. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली. आता भाजप नेत्यांच्या जिभाही सरकू लागल्या. एकंदर चांगलेच झाले. आता हाेऊनच जाऊ द्या, काेणीही अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ. ५ राज्यांच्या निकालानंतर तसेही भाजपचे अवसान गळाले आहेच. जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली.
भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीत राणे यांना स्थान
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली असून २० सदस्यांच्या यादीत खासदार नारायण राणे यांना सोळावे स्थान देण्यात आले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती (संकल्प पत्र समिती) स्थापन केली असून २० सदस्यांच्या यादीत खासदार नारायण राणे यांना सोळावे स्थान देण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातून राम माधव यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवसेना असेल तर युतीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका राणे यांनी घेतली होती. असे असतानाही राणेंचा समितीमध्ये समावेश करून भाजपने अनेकांना धक्का दिला. तर, शिवसेनाला या माध्यमातून थेट इशाराच दिला आहे. या समितीमध्ये अरुण जेटलींसह निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, किरण रिजिजू आदींचा समावेश आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी अशा १७ समित्यांची घोषणा केली.
१७ समित्यांची स्थापना :
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या सज्जतेसाठी १७ समित्या स्थापन केल्या आहेत. यात सामाजिक व सेवाव्रती संस्थांसंदर्भात स्थापन समितीचे नेतृत्व नितीन गडकरी करतील. निवडणुकीत विविध भाषांत साहित्य पुरवण्यासंदर्भात स्थापन समितीचे नेतृत्व सुषमा स्वराज करतील. विचारवंतांच्या बैठकांचे नियोजन प्रकाश जावडेकर तर रविशंकर प्रसाद पक्षाची प्रसिद्धीविषयक जबाबदारी सांभाळतील. नेत्यांच्या प्रवासासंदर्भात खास समिती असेल. सरोज पांडे यांचा समावेश असलेली १३ सदस्यीय समिती विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.