आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रात या 5 लाेकसभा मतदारसंघांत भाजप बदलणार उमेदवार..अंतर्गत गटबाजी उफाळून आली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदरच भाजपने राज्यातील खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार केले होते. त्यात ८ ते १० खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा उमटला होता. त्यापैकी ५ खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कापला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी किंवा बुधवारी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर हाेईल, त्यात या मतदारसंघात नवीन चेहरे दिले जातील, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. 

भाजपकडून उमेदवारांची यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गडचिरोलीचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून तेथून सध्या अशोक नेते खासदार आहेत. मात्र त्यांनी अपेक्षित कामे न केल्याने मतदारांत व कार्यकर्त्यांत नाराजी आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट कापून गडचिरोलीचे आमदार देवराव होळी यांना संधी दिली जाऊ शकते. अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्याविषयीही मतदारसंघात अशीच नाराजीची भावना आहे. त्यांच्या प्रगतिपुस्तकावरही लाल शेरा असल्याने त्यांना बदलून त्यांच्या जागी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार, राज्यमंत्री रणजित पाटील यांना संधी दिली जाऊ शकते किंवा शिर्डीतील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांचेही नाव येथील उमेदवारीसाठी चर्चेत आहे. 

लातूरमध्येही भाजपत अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बदलण्याची मागणी हाेत आहे. डॉ. गायकवाड यांनी मतदारसंघात चांगले काम केले असले तरी भाजपच्या एका गटाला त्यांची उमेदवारी नकाे आहे. त्यांच्या प्रगतिपुस्तकातही याचा उल्लेख असल्याने कदाचित त्यांना बदलण्यात येईल. या मतदारसंघात सुधाकर शृंगारे किंवा उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांना तिकीट दिले जाऊ शकते, असेही भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 


भंडाऱ्यातून नाना पटोले यांनी पक्ष साेडल्यानंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला हाेता. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजप सक्षम उमेदवाराच्या शाेधात आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार परिणय फुके यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यासाठी आग्रह सुुरू आहे. त्यांनी नकार दिल्यास भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांचेही नाव चर्चेत आहे. या भागात कुणबी समाजाचे वर्चस्व असल्याने फुकेंऐवजी मेंढे यांचीही लॉटरी लागू शकते. 


सांगली-मिरज येथून सध्या भाजपचे संजय पाटील खासदार आहेत. परंतु त्यांच्या जागी म्हैसाळचे भाजप कार्यकर्ते दीपक शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दीपक शिंदे यांनी यापूर्वीही भाजपकडून लाेकसभा लढवली हाेती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये माेदी लाट असतानाही संजय पाटील यांना राष्ट्रवादीतून आणून भाजपने खासदार केले. मात्र, शिंदे व पाटील गटात वाद आहेत, त्यामुळे संजयकाकांचा पत्ता कापला जाऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...