आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती अधिकाराचा वापर करणे भाजप कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले, सरपंचाच्या पुतण्याने केली हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - ग्रामपंचायत पातळीवरील राजकारण आणि भाऊबंदकीच्या वादातून लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा गावात सोमवारी सकाळी एका तरुणाचा खून झाला. यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. मृत तरुण हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


ग्रामीण भागात शेतीचे बांध, भावकीचे वाद आणि ग्रामपंचायत पातळीवरील राजकारण हे अत्यंत टोकाचे असते. त्यातून एकमेकांचे खून पाडले जातात. असाच एक प्रकार  सोमवारी शिरोळ वांजरवाडा (ता. निलंगा) गावात घडला. राजेंद्र जाधव हा तरुण सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत गावातील टपरीवर चहा पित बसला होता. त्यावेळी त्याच्याच भावकीतील सुरेश जाधव याने राजेंद्रवर चाकूने वार केले. यामध्ये राजेंद्र गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. यामुळे शिरोळ वांजरवाडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी गावात बंदोबस्त वाढवला.  

 

राजेंद्रने केल्या हाेत्या तक्रारी
 मृत राजेंद्रवर हल्ला करणारा सुरेश हा विद्यमान सरपंच विश्वास जाधव यांचा पुतण्या आहे. राजेंद्रने ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे केलेल्या कामांच्या माहितीसाठी  आरटीआय अर्जही टाकले होते. राजेंद्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक तक्रारी करत असल्याच्या भावनेतून सुरेशने त्यावर वार केले, असे पोलिस आणि ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.