Politics / पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने; पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा करून पांगवण्याचा प्रयत्न

राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा केला निषेध

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 03:20:01 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिस समोरासमोर आले. कोलकात्यातील लाल बजार परिसरात बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस मुख्यालयास घेराव टाकला. तसेच काहींनी पोलिस मुख्यलयाभोवती लावलेले बॅरिगेट तोडून घुसण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. याच दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा मारा करत अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. भाजपच्या तीव्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर 3 हजार पोलिस जवान तैनात करण्यात आले आहेत. हे सर्वच भाजप कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा विरोध करत होते.


बंगालला गुजरात होऊ देणार नाही -ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांवर आपल्या सहकाऱ्यांच्या हत्येचे आरोप लावत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा हिंसाचार थांबलेला नाही. भाजपने दावा केला की 8 मार्च रोजी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 4 भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. सोबतच, या राज्यात जय श्री राम बोलल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत असा आरोप देखील भाजपने केला आहे. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आपल्या पक्षाचे 8 आणि भाजपचे 2 कार्यकर्ते मारले गेले असे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर भाजपकडून पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मी तसे होऊ देणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा -भाजप नेते
भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले, की "पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. त्याच लोकांच्या भावना भडकावण्याचे काम करत आहेत. ठिकाणी लोकसभा निवडणुकीत ज्या-ज्या तृणमूलचा पराभव झाला, त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातील सगळेच गुंड तृणमूलमध्ये आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडे शस्त्र नाहीत. असे सुरू राहिल्यास केंद्राला हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल."

X
COMMENT