आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारबाज बारामतीला भेदण्यासाठी भाजपकडून ‘येळकोट’चा प्रयोग!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर 

बारामती - तब्बल ४० वर्षांपासून बारामतीवर पवार घराण्याचेच वर्चस्व आहे. उद्योगांमुळे रोजगार, वीज, पाणी, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आदींसह विविध विकासकामांमुळे येथे पवारांची चलती आहे. पवार घराण्यातील उमेदवारांना घेरण्यासाठी ‘जातीय’ ध्रुवीकरणांचा नेहमी आधार घेतला जातो. तसा यंदाही पवारांच्या विरोधात ‘येळकोट’चा प्रयोग आहेच. धनगर समाजातील नवनेतृत्व गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून पवारांना पाडण्याची खेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आखली खरी. पण स्थानिकांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर अजितदादा हे आव्हान कसे पेलतात, याची सर्वांना उत्सुकता आहे. 

फक्त ५० विश्वासू मित्रांसोबत बारामतीवर स्वारी : ३ आॅक्टोबरला पडळकर सांगलीहून बारामतीत दाखल झाले. ४ आॅक्टोबरला अर्ज दाखल केला. दुपारी दीड वाजता काढलेल्या रॅलीचा समारोप सायंकाळी चार वाजता झाला. बारामती नगर परिषदेसमोरील सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरलेले होते. त्यांच्या रॅलीत युवकांचे प्रमाण उल्लेखनीय होते. सांगलीहून पडळकर फक्त ५० विश्वासू मित्रांना घेऊन आलेले आहेत. उमेदवार बाहेरील असला तरी यत्किंचितही नाराजीचा सुर न आवळता पडळकरांच्या विजयासाठी तन-मन-धनाने कामाला लागलेले भाजपचे कायकर्ते निष्ठेचे अनोखे उदाहरण बारामतीतून देत आहेत. 

पवारांचे प्रचारप्रमुख म्हणताहेत, जातीय ध्रुवीकरण चालत नाही
ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे अजित पवारांचे प्रचार प्रमुख आहेत. तगडे आव्हान असताना अजित पवार प्रचारात का नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘ त्यांचे एवढे काम आहे की, स्वत: प्रचारात सहभागी होण्याची दादांना गरजच पडत नाही. मतदारच म्हणतात की आमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. त्यामुळे नामांकन दाखल केल्यानंतर राज्यातील उमेदवारांच्या प्राचारासाठी दादा जातात. प्रचार थांबवल्यावरच बारामतीत येतात. पण कुठलेही जातीय ध्रुवीकरण बारामतीत चालत नाहीत. नेहमी येथे बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो हेच आमचे यश आहे.’
 

४२ गावांत पिण्याचे पाणी नसल्याचा प्रमुख मुद्दा
 बारामती मतदारसंघात एकूण १४८ गावे असून ९९ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्हा परिषद, बारामतीची पंचायत समिती आणि नगरपरिषदही अजित पवारांच्या ताब्यात आहे. तरीही १४८ पैकी ४२ गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाहीये. ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बारामतीचा ३५ टक्के भाग कायम दुष्काळी छायेत असतो. हीच समस्या भाजपने प्रचाराचा प्रमुख मुद्दा केली आहे. 
 

या मतदारसंघात ग्रामीण मतदारच निर्णायक 
भूमिका वठवत असतात. त्यापैकी टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या ४२ गावांमध्ये ८८ हजार मतदार आहेत. या मतदारांना गोंजारण्याचे काम भाजप करावे लागत आहे. शिवाय पवारांचा माळी, बौद्ध, मराठा, धनगर मतदार फोडण्यासाठी पवारांकडे असलेले नेतेही फोडावे लागणार आहेत. 
 
4 लाख 41392 एकूण मतदार
82 हजार 878 शहरी मतदार
2 लाख 58,514 ग्रामीण मतदार
 
धनगर 92 हजार 
मराठा 85 हजार  
बौद्ध 55 हजार
माळी 45 हजार
मुस्लिम 22  हजार
ओबीसी 42 हजार
 

बातम्या आणखी आहेत...