आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा निर्धार : विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी भाजप तयारी करणार; काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागांतच गुंडाळू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीपूर्वी भाजप कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. - Divya Marathi
बैठकीपूर्वी भाजप कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले.

मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास १० जागांवर थांबतील. वेगळे लढूनही युतीला मात्र १७० जागा मिळतील,’ असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती असून युतीबाबतचा मुख्यमंत्रिपदाचा व खातेवाटपाचा निर्णय तेच घेतील, असेही ते म्हणाले. गोरेगाव येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या सर्व २८८ जागांची तयारी करण्याचे आदेश दिले.


उपस्थित पदाधिकाऱ्यांसमाेर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजपत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले तरी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. इतर पक्षांतले २०-२२ आमदार आले म्हणून बिघडत नाही. हा पक्ष प्रत्येकाला त्याच्या गुणाप्रमाणे काम देतो. त्यामुळे गुणात्मक संघटन मजबूत करा. अापल्या कार्यकाळात संघटनेचं कल्चर मजबूत करण्याला आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून प्राधान्य देणार आहाेत.’


‘ईव्हीएमध्ये घोटाळा होता तर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विजय कसा झाला?’, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. लोकसभेत युतीला राज्यात ५१ टक्के मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीमुळे युतीच्या अधिक जागा निवडून आल्याच नाहीत. बूथरचना व पन्ना प्रमुखांमुळे या निवडणुकीत युतीने बाजी मारल्याचे पाटील म्हणाले. विधानसभेसाठीच्या युतीच्या बाेलणीसंदर्भात चौकट निश्चित झाल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पक्षाचा झेंडा नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हाती देत मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.’  

 

आता काँग्रेसची अवस्था बर्म्युड्यासारखी झाली : रावसाहेब दानवे 

‘नाथसागराची खोली अन् दानवेंची बोली मराठवाड्याची ओळख आहे,’ असे सांगत आपल्या बोलण्याने कितीही वाद उद॰भवले तरी आपण आपली मराठवाड्याची भाषा सोडणार नाही, असे भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी स्पष्ट केले. मी गंभीर झालो तर पक्षात मी नाराज असल्याचा निरोप जाईल, त्यामुळे आपण गंभीर होत नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, पण गरिबांनी काँग्रेसलाच हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप २ वरून ३०३ गेली तर काँग्रेसचा मात्र आज बर्म्युडा झाला आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

 

बैठकीला गडकरी, पंकजा मुंडे, मुनगंटीवारांची अनुपस्थिती
गोरेगाव येथे रविवारी भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राज्य प्रभारी सरोज पांडे, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, एकनाथ खडसे, मंत्री आशिष शेलार, मंत्री विनाेद तावडे हजर होते, तर नितीन गडकरी, पंकजा मुंडे व सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. गडकरी अनुपस्थित असल्याने ते नाराज आहेत काय, अशी चर्चा या वेळी होती.

बातम्या आणखी आहेत...