आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत महायुतीला धक्के: भाजपचे डॉ. पाटील, शिवसेनेचे संजय निंबाळकर, दुधगावकर राष्ट्रवादीमध्ये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - प्रस्थापित नेत्यांच्या पक्षांतरानंतर रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते प्रयत्न करीत असतानाच शिवसेना-भाजपमधील नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये उड्या घेतल्याने राजकारणाचा मंच नाट्यमय वळणावर आला आहे. उस्मानाबादेत भाजपच्या डॉ. प्रतापसिंह पाटलांसह शिवसेनेचे संजय निंबाळकर, संजय दुधगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर तिकडे तुळजापुरात राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंनी आणि भूमचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले युवा सेनेचे विस्तारक तथा उस्मानाबादचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंके शुक्रवारी  अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

बहुचर्चित उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षांतर्गत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.   दुसरीकडे तुळजापुरातून शिवसेनेकडून इच्छुक असलेले संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेला भाजपतून शिवसेनेत गेलेले संजय पाटील दुधगावकर यांनीही संजय निंबाळकरांसमवेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पक्षाचे नेते जीवनराव गोरे यांच्या निवासस्थानी हे प्रवेश झाले. दरम्यान, त्यानंतर काही तासांतच भाजपचे डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रात्री उशिरापर्यंत आणखी काही शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. तिकडे राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे  वंचित बहुजन आघाडीत गेले. त्यांना वंचितकडून उमेदवारी मिळाली.  शिवसेनेचे भूमचे तालुकाप्रमुख  सुरेश कांबळे यांनीही गुरुवारी  राजीनामा दिला असून वंचित तर्फे शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.  
 
 

परंड्यात वंचितने बदलला उमदेवार,
परंडा विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीने दोन दिवसांपूर्वीच काकासाहेब मारकड यांना उमेदवारी दिली होती.मात्र, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून वंचितमध्ये प्रवेश केल्याने त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. ते शुक्रवारी वंचित आघाडीकडून अर्ज भरणार आहेत.