आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पाहुण्यां'च्या खास 'वॉर रूम'मधून भाजपचा हायटेक प्रचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचार सुरू केला अाहे. प्रचारासाठी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी 'पाहुण्यां'साठी असलेल्या खास दालनात 'वॉर रूम' तयार करण्यात आली असून, तेथूनच प्रचाराची सूत्रे हलवली जात आहेत. प्रचारासाठी 'परिवर्तन होणार, नगर बदलणार' ही टॅगलाइन भाजपने तयार केली आहे.


महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह अन्य पक्ष उतरले आहेत. महापालिकेत सध्या शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली, तरी आठ महिन्यांपूर्वीच भाजपने शिवसेनेबरोबर काडीमोड घेऊन सत्तेवर लाथ मारली आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची एकतर्फी सत्ता आहे. महापालिका निवडणुकीतही भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. महापालिकेची एकहाती सत्ता घेण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली असून, भाजप तिन्ही सर्व्हेच्या अंदाजांवर सत्तेची स्वप्न पहात आहे. प्रदेशस्तरावरून देखील महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चोबांधणी करण्यात आली आहे.


दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढवून जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्रीही या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. त्याचबरोबर मंत्र्यांचे रोड शोचेदेखील नियोजन करण्यात आले आहे.


भाजपने सध्या हायटेक प्रचारावर भर दिला असून, खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी 'पाहुण्यां'साठी तयार करण्यात आलेल्या 'वॉर रुम'मधून प्रचाराची सूत्रे हलवण्यात येत आहेत. पारंपरिक प्रचारासोबतच होर्डिंग कॅम्पेन, फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि ट्विटर माध्यमातून हायटेक प्रचाराचेही नियोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी काही व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. अन्य पक्षही अशाच प्रचाराच्या तयारीत सध्या आहेत.

 

महापालिका निवडणुकीतनव्या तंत्रांचा यंदा वापर

'परिवर्तन होणार, नगर बदलणार' कॅम्पेनची चर्चा


नगर शहराचे प्रमुख चौक, महत्त्वाचे रस्ते, तसेच मोक्याच्या ठिकाणी आपले होर्डिंग लावत भाजपने प्रचाराच्या प्रभावी माध्यमाचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. 'परिवर्तन होणार, नगर बदलणार' ही टॅगलाइन असलेले हे होर्डिंग कॅम्पेन नगरकरांच्या चर्चेचा विषय बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...