Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | BJP's internal grouping in nagar

भाजपतील अंतर्गत गटबाजीला पक्षश्रेष्ठी वैतागले, म्हणाले, 'हद कर दी आपने'

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 04:59 AM IST

शिंदे, गांधी व आगरकर यांनी एकत्र बसून वाद मिटवण्याचा सल्ला

  • BJP's internal grouping in nagar
    नगर - नगर शहर भाजपमधील खासदार दिलीप गांधी व माजी शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यातील गटबाजीला पक्षश्रेष्ठींही वैतागले आहेत. मुंबईत या दोन्ही नेत्यांशी पक्षश्रेष्ठींनी चर्चा करुन आपसातील गटबाजी संपवा असे सांगितले असले, तरी दोन्ही नेत्यांकडून मात्र गटबाजी संपल्याचे जाहीर न झाल्यामुळे संभ्रम वाढला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नेहमीच अशी सूचना वरिष्ठांकडून केली जाते, परंतु तिला केराची टोपली दाखवली जाते, असा अनुभव आहे. वाद मिटवण्याची जबाबदारी श्रेष्ठींनी स्वत: न घेता 'त्यांच्यातील वाद नको रे बाबा' म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांवर ढकलली आहे.

    मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी-आगरकर यांच्यातील गटबाजी मिटवण्यासाठी या दोन्ही नेत्यांना मंगळवारी मुंबईत बोलवण्यात आले होते. बैठकीस पालकमंत्री राम शिंदे, सरचिटणीस आमदार सुरजितसिंग ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक, किशोर काळकर यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आगरकर, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, मनेष साठे, संपत नलावडे, संजीव ढाेणे, किशोर बोरा उपस्थित होते. प्रारंभी सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवण्यासाठी आग्रह धरला. गटबाजीचा फायदा शिवसेनेला होतो. गटबाजी पक्षासाठी चांगली नसल्याचे पक्षश्रेष्ठींचा निदर्शनास आणून देण्यात आले. आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करुन घेण्याचे अधिकार शहराध्यक्ष म्हणून गांधी यांना देण्यात आले. त्यानंतर लगेचच पालकमंत्री शिंदे, पुराणिक, ठाकूर, काळकर यांनी गांधी व आगरकर यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन या नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद मिटवावा, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.

    नेमेचि येतो पावसाळा...
    नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करुन गांधी-आगरकर वाद मिटलेले नाहीत आणि आताही ते मिटवण्यासाठी श्रेष्ठी स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे भाजपची मुंबईला झालेली बैठक म्हणजे 'आला वारा गेला वारा' अशी ठरली. दरवर्षी पावसाळा येतो त्याप्रमाणे निवडणुका आल्या की, हे वाद समन्वयातून मिटवण्याची भूमिका घेतली जाते.प्रत्यक्षात पक्षाच्या पदरात मात्र निराशाच पडते.

Trending