आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फोन टॅप होत असल्याची माहिती भाजपच्याच मंत्र्याने दिली होती', संजय राऊतांचा खळबळजनक दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई- राज्यात सध्या फोन टॅपिंगचे प्रकरण चांगलेच वाढले आहे. सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विरोधकांची फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. फोन टॅप होत असल्याची माहिती मला एका भाजप नेत्यानेच दिली, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेकांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, फोन टॅपिंगची माहिती मला एका भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यानेच दिली होती. त्यावेळी माझे बोलणे कुणाला ऐकायचे असेल तर, त्याचे स्वागतच करतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपूनछपून करत नाही. माझे बोलणे ऐकाच, असे मी त्यांना म्हणालो होतो. असा दावा संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

फडणवीस सरकार असताना, विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यामुळे गृह खात्याने सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचे ठरविल्याचे समजते.

भीमा कोरगाव हे एक षडयंत्र, फोन टॅपिंग एक विकृती- जिदेंद्र आव्हाड

फोन टॅपिंगबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पेगॅसस आणि फोन टॅपिंग ही एक विकृती असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मागील भाजप एक विकृत सरकार होते. भीमा कोरेगावची दंगल समाजात तेढ निर्माण करने आणि जाती धर्मांमध्ये फूट पाडण्यासाठीच घडवून आणल्याचा खळबळजनक आरोपही आव्हाडांनी यावेळी केला. पेगासस या इजरायली कंपनीच्या माध्यमांतून राज्यातील अनेकांचे फोन टॅप केले जात होते. अशी माहिती खुद्द फेसबुकनेच दिल्याने गत सरकारचे पितळ उघडे पडल्याचे ते म्हणाले. 

फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस

फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले आहे. 'राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. जे आरोप करताहेत, त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही आपली संस्कृती नाही. तरीही सरकारला चौकशी करायची असेल तर ती तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्य मंत्री खुद्द शिवसेनेचेच होते,' असेही फडणवीस म्हणाले.