आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा सत्तेचा असाही गैरवापर; शिवसैनिकांना रात्रीतूनच पिटाळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान गर्दी कशी कमी राहील, याची खबरदारी केंद्र सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातून विशेष रेल्वेने अयोध्येत ४ हजारांहून अधिक शिवसैनिक दाखल झाले होते. मात्र, शिवसैनिकांची सायंकाळी शरयू नदीकाठी होणारी गर्दी कमी कशी राहील, यासाठी रविवारी सकाळी परतणाऱ्या रेल्वे गाड्या रात्रीच जाणार असल्याचे निरोप शनिवारी दुपारीच देण्यात आले.

 

त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात फिरणारे येथील सैनिक सायंकाळची आरती सोडून आपापली रेल्वे पकडण्यासाठी स्थानकाकडे परतले. नदीकाठी झालेल्या आरतीला गर्दी कमी असण्याचे हे एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.  


मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद येथून चार विशेष रेल्वे गाड्या शनिवारी सकाळीच अयोध्येत पोहोचल्या होत्या. त्यासाठी ठिकठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी व्यवस्थित नियोजन केले होते. शनिवारी सकाळी ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी सर्व जण येथे दाखल होतील आणि उद्धव ठाकरे जेव्हा राम मंदिराचे दर्शन घेऊन रवाना होतील तेव्हा सर्व जण परततील, असे हे नियोजन होते. त्यानुसार सायंकाळी शरयू नदीच्या काठी होणाऱ्या पूजेसाठी ही मंडळी उपस्थित राहू शकणार होती. मात्र, चारपैैकी तीन रेल्वे या वेळेपूर्वीच रवाना होणार असल्याचा संदेश शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोबाइलवरून देण्यात आले. त्यामुळे अनेकांना सायंकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याऐवजी रेल्वे स्थानक जवळ करण्याची वेळ आली.  


विशेष रेल्वे या एका व्यक्तीच्या नावे बुक केल्या जातात. त्यामुळे त्याचे संदेश हे एकाच व्यक्तीच्या नावे येतात. नाशिक येथील रेल्वे स्थानिक शिवसेना नेत्याने ३० लाख रुपये भरून बुक केली होती. त्यात १२४३ प्रवासी आहेत. ते शनिवारी पहाटे अयोध्येत पोहोचले. नियोजित वेळापत्रकानुसार ते रविवारी सकाळी ९ वाजता शहरातून रवाना होणार होते. मात्र, तसे झाले नाही. दुपारी चार वाजता नोंदणी करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर संदेश आला. त्यानुसार रविवारी सकाळी निघणारी रेल्वे ही वाहतुकीच्या अडचणीमुळे शनिवारी रात्री ११ वाजताच स्थानक सोडेल. त्यामुळे सर्वांनी १० वाजेपूर्वी रेल्वेस्थानकावर यावे, असे सांगण्यात आले. अयोध्येतून फैजाबाद रेल्वेस्थानक गाठण्यासाठी सायंकाळच्या वेळी किमान दीड तास लागतो. परिसराची माहिती नसलेल्यांसाठी जास्तीची वेळ लागणार होती. अनेकांनी सायंकाळी सहा वाजताच अयोध्या सोडली. परिणामी त्यांना शरयू तीरी होणाऱ्या आरतीवर पाणी सोडावे लागले.  

 

औरंगाबादच्या रेल्वेची वेळही अलीकडे  
औरंगाबादहून शनिवारी सकाळी अयोध्येत ८०० जणांना घेऊन दाखल झालेली रेल्वे ही नियोजित वेळेनुसार सोमवारी सकाळी औरंगाबादकडे रवाना होणार होती. परंतु तिची वेळही रविवारवर आणण्यात आल्याचे एका प्रवाशाने सांगितले. मात्र, त्याची नोंदणी करणाऱ्या शिवसेना नेत्याने संदेश बघितलेला नसल्यामुळे नेमकी वेळ कोणती हे शनिवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. रेल्वेच्या सूत्रच्या मते, ज्या रेल्वे विशेष म्हणून बुक केल्या जातात. वेळेत बदल करण्याचे अधिकार रेल्वेकडे आहेत. इतर गाड्यांना बाधा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.

 

चार हजार सैनिकांची नुसतीच धावपळ  
महाराष्ट्रातून आलेल्या चार रेल्वेंतून जवळपास चार हजार सैनिक येथे दाखल झाले होते. रेल्वेने वेळेत बदल केल्याचे समजल्याने या चार हजार जणांची धावपळ झाली.  यामागे अर्थात सत्ताधारी असल्याचे बोलले जात आहे.

 

- रेल्वेने वेळेआधीच गाड्या काढल्याने आरतीच्या वेळी गर्दी रोडावली?  
- विशेष रेल्वे १० तास आधीच परत काढली   
- रविवारी सकाळी ९ वाजता निघणारी नाशिकची श्रीराम एक्स्प्रेस शनिवारी रात्री ११ वाजताच निघाली  

 

बातम्या आणखी आहेत...