Guess / भाजपची सत्ता आली तरीही इतरांच्या टेकूवर; मात्र मोदी पंतप्रधान होणे नाहीच : राजकीय अभ्यासकांचा अंदाज

पंतप्रधानपदासाठी संघाकडून येऊ शकते एखादे पर्यायी नाव पुढे
 

चंद्रकांत वानखेडे

May 14,2019 10:02:00 AM IST

एकीकडे लोकसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी “मोदींशिवाय आहेच कोण?’च्या ढोलगर्जना. त्यातच “मातोश्री’चे उंबरठे झिजवण्याचा भाजपचा प्रयत्न. आधी मुख्यमंत्री, नंतर खुद्द भाजपच्या ‘शहेनशहां’चे नाक घासत मातोश्रीला शरण जाणे. ज्यांनी जाहीरपणे चौकीदारालाच चोर म्हटले त्यांच्याशी, त्यांनी त्यांच्याच अटी व शर्तींवर “युती’ करणे, तेही कोणी तर “शत प्रतिशत भाजप’चे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांनी? बरं हे महाराष्ट्रातच घडले असे नाही, तर बिहारमध्येही तेच. स्वत:च्या सहा लोकसभेच्या जागा नितीशकुमारांना “समर्पित’ कराव्या लागल्या. हे संकेत कमजोरपणाचे होते की शक्तिमान असण्याचे? पण “ढोलगर्जनेत’ असे प्रश्न विरून जाणे, हेही स्वाभाविकच होते. त्यातही राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष कोठे होता. जो होईल असे वाटत होते, त्याच्या नेत्यालाच “पप्पू’ ठरवले गेले. या परिस्थितीला “युद्धजन्य’ वातावरणाचे नेपथ्य मिळाले. मग काय ‘सोने पे सुहागाच’. मागील पाच वर्षांत काय केले, हा प्रश्नही उठण्याची शक्यता नाही. आणि उठलाच समजा तर “देशभक्त विरुद्ध देशद्रोही’ अशी संघर्षरेषा आखली की मग सारेच संपले. अशी ही राजकीय रंगमचावरील रचना आहे.


रेषेच्या आत स्वाभाविकपणे सत्ताधारी “देशभक्त’ आणि रेषेच्या बाहेर “देशद्रोही’ विरोधक. रेष ओलांडली तरी मुळातच कमजोर असलेला विरोधी पक्ष आपसूकच जळून खाक होणार. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वसाधारण ही परिस्थिती होती. निवडणुकीची घोषणा झाली. मैदान साफ असल्याच्या तोऱ्यात सत्ताधारी बोलू लागले. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ मार्क्स.. इतर राज्यांतही तसाच परफॉर्मन्स राहणार.. नागपुरात तर काय गडकरी या वेळेस चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार.. वगैरे.


पण जसजशी निवडणुकांची तारीख जवळजवळ येत गेली, तसतशा निवडणुका अटीतटीच्या होत गेल्या. महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी. आज कोणीही अपवाद वगळता छातीठोकपणे हाच निवडून येईल, इतकेच निवडून येतील, असे बोलत नाही. मग हे घडलं कसं? सत्ताधारी पक्ष तर सर्वच पातळ्यांवर बलाढ्य व विरोधी पक्ष कमजोर असताना? सत्ताधारी पक्षाने मतदारांसाठीच “बूथ’प्रमुखच नव्हे, तर मतदार यादीतील पानापानांसाठी “पेज’प्रमुखदेखील नेमले होते. नुसतेच नेमले नाहीत, तर त्यांना प्रशिक्षित करून सोडले असताना हे घडले कसे?
“लोक’शाहीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष असतात हे खरे. पण या लोकशाहीमध्ये “लोक’ही असतात, त्यांचाही एक “पक्ष’ याचा विसर पडल्यामुळे. या वेळेस २०१४ प्रमाणे मोदी लाट नव्हती, यावर आता फारसे तीव्र मतभेद नाहीत. त्यावर सत्ताधारी मुजोरी करत म्हणू शकतात ती “गुप्त- सुप्त’ होती. म्हणजे आता उघड लाटेला २०१९ मध्ये गुप्त- सुप्त व्हावे लागले हा बदल तर सत्ताधारी मान्य करतात. म्हणजेच लाटेत निवडून येणाऱ्या जागांपेक्षा गुप्त-सुप्त लाटेने जागा मागच्यापेक्षा वाढण्याची सुतराम शक्यता नाही. त्या कमीच होणार. किती कमी होणार? ग्रामीण भागातील सत्ताधाऱ्यांविरोधातील आक्रोश बघता यांना निर्भेळ बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. हे तर आता जवळपास मान्य होत आहे. सत्ताधाऱ्यांची बोलीभाषा काहीही असली तरी त्यांची बॉडी लँग्वेज ही बाब मान्य करताना स्पष्ट दिसते आहे. निवडणुकीचे चार टप्पे संपल्यानंतर त्यांना “उग्र हिंदुत्ववादी’ चेहरा “साध्वी’च्या रूपात समोर करावा लागतो.


“विकासाचा’ जो काही तथाकथित मुखवटा आहे तो फेकून देऊन या “चेहऱ्या’निशी त्यांना निवडणुकीचा जुगार खेळावासा वाटतोे, यातच पाणी नाकातोंडापर्यंत आले आहे, हे सिद्ध होते. अर्थात जुगार म्हटला की त्यात जय-पराजय काहीही होऊ शकते. पण एकूण हाही जुगार अंगलटच येईल, असेच सध्या तरी दिसते आहे.

पंतप्रधानपदासाठी संघाकडून येऊ शकते एखादे पर्यायी नाव पुढे
एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत २०१४ मध्ये भाजपला निर्भेळ बहुमत मिळाले, तसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची एखादवेळ सत्ता बनेल, पण इतरांच्या टेकूशिवाय नाहीच. अशी परिस्थिती असेल तर मोदी कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होणे नाही. कारण ज्यांनी टेकू दिला त्यांना मोदी पंतप्रधान म्हणून नको असतील. त्याची वाच्यता सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याने झाली आहे. अशा परिस्थितीत संघसुद्धा मोदींचे वर्चस्व नाहीसे करण्यासाठी त्यांना प्रिय असलेले नाव पुढे करू शकतो. त्यामुळे पुढील सत्ता कोणाची असेल-नसेल हे जरी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी या देशाचा पुढचा पंतप्रधान मोदी असणार नाहीत, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

X
COMMENT