आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP's Social Media Warroom Boasts A Force Of More Than 12 Thousand Activist And 1 Lakh Youth

भाजपच्या सोशल मीडिया वॉररूममध्ये तब्बल १२,३०० कार्यकर्ते, दीड लाख तरुणांची फौज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी  

मुंबई - विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानासोबतच अॉनलाइन प्रचाराचाही धुरळा उडत असून यात भाजपनेही जोरदार आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजपची सोशल मीडिया आणि आयटी टीम कामाला लागली होती. मुंबईतील भाजप कार्यालयात उभारण्यात आलेल्या वॉर रूममध्ये १२,३०० तरुण एक रुपयाचा मोबदलाही न घेता या सायबर युद्धात उतरले आहेत. त्यांना भाजपच्या पेज लेव्हलपर्यंतच्या १.५ लाखाहून अधिक कार्यकर्त्यांची साथ मिळाली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या सोशल मीडियावर ३५ ते ४० पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.  

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारताला सोशल मीडियावरील प्रचाराचे महत्त्व कळले. त्यानंतर भाजपने लोकसभेसाठी उभारलेली सोशल मीडियाची प्रचार यंत्रणा लगेच आलेल्या विधानसभेसाठी कायम ठेवली. २०१९ च्या विधानसभेपर्यंत ती अधिकच जोमाने वाढली आहे. आजघडीला एखाद्या कॉर्पाेरेट कंपनीप्रमाणे भाजपच्या सोशल मीडिया अँड आयटी सेलचे कामकाज चालते.
 

अशी आहे रचना : पेज लेव्हलपर्यंत विस्तार
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयटी सेल उभारण्यात आला आहे. प्रवीण अलई टीमचे संयोजक आहेत. टीममधील काहींचे शिक्षण सुरू आहे, काही नोकरी करतात, तर काहींचे व्यवसाय आहेत. पण ते सांभाळून हे तरुण येथे सेवा देतात. 
 

अशा तयार केल्या जातात पोस्ट्स
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर कोअर टीम पोस्ट बनवते. धोरणात्मक पोस्टला वरिष्ठांची मंजुरी लागते. सरकारी योजना, बैठकांचा संदेश, माहिती आदी असेल तर कोअर टीमच्या संमतीने ती पोस्ट केली जाते. रोज २० ते २५ पोस्ट तयार होतात. 
 

अशा व्हायरल केल्या जातात पोस्ट्स
मंत्री, खासदार-आमदार, जिल्हाध्यक्षांकडून आलेल्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. दिवसभरात ३५ ते ४० पोस्टद्वारे वातावरण ढवळून काढले जाते. काही पोस्ट राज्यभर तर काही त्यातील मजकुराप्रमाणे विभागनिहाय व्हायरल केल्या जातात.
 

अशी केली जाते तयारी : जिल्हानिहाय डेटा बँक उभारली
अवईंनुसार, पक्षाचे नेटवर्क मजबूत असल्याने आपोआपच लाइक्स व शेअर होतात. अनेकदा विरोधी पक्ष चुकीची माहिती टाकतात. त्यावर आकडेवारीसहित खरी माहिती टाकली जाते. यासाठी शासकीय योजनांची आकडेवारी व अन्य माहितीची डेटा बँक तयार आहे. यामुळे १० मिनिटांच्या आत काउंटर पोेस्ट टाकता येते.
 

प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शन
यंदा जुलै महिन्यात सोशल मीडियातील ४०० प्रभावी व्यक्तींच्या पुणे-मुंबईत बैठका बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. यातील ९० टक्के लोक भाजपशी संबंधित नव्हते. त्यांच्याकडून सोशल मीडियातील लेटेस्ट ट्रेंड जाणून घेण्यात आले. त्यानंतर भाजपचे फॉलोअर वाढले, अशी माहिती प्रवीण अलई यांनी दिली. 
 

सायबर हल्ल्याविरुद्ध सज्जता
निवडणुकीच्या काळात सायबर हल्ल्याचाही धोका आहे. अकाउंट हॅिकंग होऊ शकते. यासाठी सायबर इव्हेस्टिगेटर, इंजिनिअर आणि वकिलांची एक टीम तयार आहे.
 

प्रवीण अलई : २० वर्षांपासून पक्षासाठी काम, आता मिळाली मोठी जबाबदारी
प्रवीण अलई नाशिकच्या देवळा गावातले आहेत. २० वर्षांपासून पक्षासाठी काम करतात. २०१४ मध्ये त्यांनी नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा-लोकसभा, २०१९ ची लोकसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे सोशल मीडिया हँडल केले. पक्षाला अभिप्रेत ज्ञान, अभ्यास आणि कल्पकतेच्या जोरावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना यंदा राज्याच्या मध्यवर्ती सोशल मीडिया सेलची जबाबदारी सोपवली.
 

विभागवार मीडिया सेंटर उभारणार 
सोशल मीडियावरील प्रचाराला आलेल्या महत्त्वामुळे आता राज्यातील ७ विभागांत मीडिया सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कामात सुटसुटीतपणा येईल. विभागवार प्रश्नांना अधिक प्राधान्य देता येईल. त्या-त्या भागातील तरुणांच्या प्रतिभेला वाव मिळेल.
- प्रवीण अलई, राज्य संयोजक, सोशल मीडिया आणि आयटी सेल, भाजप, मुंबई
 
> 17 जणांची कोअर टीम सोशल मीडियासाठी
> 12,300 तरुण स्वेच्छेने शिफ्टमध्ये काम करतात
> 1.5 लाखाच्या वर सर्व मिळून संख्या जाते.
> 07 विभागांत राज्यातील 288 मतदारसंघांची विभागणी
> याअंतर्गत जिल्हा, तालुका, बूथ आणि प्रत्येक पेजप्रमुखाचा सेलमध्ये समावेश आहे.