आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये प्रचंड राडा, केंद्रीय मंत्री दानवेंच्या समाेर पक्षात पुन्हा एकदा असंतोषाच्या भडक्यातून 'लात की बात'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ खडसे समर्थक जिल्हा सरचिटणीसाला कार्यकर्त्यांनी स्टेजवरच लाथांनी तुडवले
  • व्यासपीठावर जुंपली, डॉ. सुनील नेवेंवर फेकली काळी शाई
  • नाराजीच्या शाईचे शिंताेडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर उडाले
  • खडसे समर्थक नेवेंच्या मनमानी कारभारावर कार्यकर्त्यांचा राेष

​​​​​​जळगाव : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जळगावात अायाेजित केलेल्या सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमाेरच राडा झाला. भुसावळ येथील नाराज कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जात सूत्रसंचालन करणाऱ्या खडसे समर्थक व भाजप जिल्हा सरचिटणीस डाॅ. सुनील नेवे यांच्या ताेंडाला काळे फासून त्याना खाली पाडले आणि लाथांनी तुडवले. अमळनेरच्या सभेची पुनरावृत्ती हाेत असल्याचे जाणवताच मंत्री दानवेंनी सभेतून काढता पाय घेतला. संतप्त कार्यकर्त्यांनी फेकलेली शाई अंगावर पडल्याने दानवे सभेतून निघून गेले. वातावरण निवळल्यानंतर तासाभराने ते पुन्हा दाखल झाले.


भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी दुपारी संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात सभा हाेती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, अा. सुजितसिंह ठाकूर, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित हाेते.

पुण्याला गेलेले एकनाथ खडसे बैठकीला नव्हते. जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू हाेताच भुसावळ येथील कार्यकर्ते व्यासपीठावर चढले. प्रा. नेवे दिसताच त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना खाली पाडले. काहींनी त्यांना लाथांनी तुडवले. सभागृहात गाेंधळ उडाला. याच वेळी गिरीश महाजनांसह पदाधिकारी नेवे यांच्या बचावासाठी सरसावले. कार्यकर्त्यांनी फेकलेली शाई अंगावर पडल्याने केंद्रीय मंत्री दानवे यांनी गर्दीतून थेट बाहेर पडणे पसंत केले. महाजनांच्या मध्यस्थीनंतर खा. हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली.

अामदार महाजनांकडून बचाव

चालून अालेल्या जमावाला नियंत्रीत करण्यासाठी अामदार गिरीश महाजन यांनी पुढे येऊन माइकचा ताबा घेतला. सर्वांना त्यांनी व्यासपीठाखाली ढकलून स्वत: ते खाली उतरले. तब्बल तासाभराने हा गाेंधळ नियंत्रणात अाला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विजय धांडे यांनी मंत्री दानवेंच्या अनुपस्थितीत जिल्हाध्यक्ष निवडीची पुढची प्रक्रिया सुरू केली. सर्व इच्छुकांची मते जाणून घेतल्यानंतर महाजन यांनी मंत्री दानवेंना सभागृहात येण्यासाठी फाेन केला. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी बाहेर पडलेले दानवे ३ वाजता सभागृहात पाेहाेचले.

मारहाणीत चष्मा फुटला : मंत्री दानवे अाणि माजी मंत्री गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांना खाली बसण्याच्या सूचना करीत असताना त्यातील काहींनी थेट व्यासपीठावर उडी घेऊन प्रा. नेवे यांच्या ताेंडाला शाई फासली. त्याच्या पाठाेपाठ अाणखी तीन कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेतली. नेत्यांना काही कळण्याअाधीच प्रा.नेवेंना खाली पाडून लाथांनी तुडवले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत प्रा. नेवे यांचा चष्मा फुटला. अामदार गिरीश महाजन यांनी पुढे येऊन प्रा. नेवेंचा बचाव केला. जिल्हा परिषद सदस्य पाेपट भाेळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अशाेक कांडेलकरांनी सर्वांना अावरले.सत्ता नसताना गटबाजी टाळण्यासाठीच जिल्हाध्यक्षपदी हरिभाऊ जावळेंची वर्णी

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात गटबाजीने संघटन ढासळत अाहे. त्यातच राज्यात सत्ता नसल्याने संघटनेत गटबाजी वाढू नये म्हणून संयमी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली. प्रदेशाध्यक्ष अामदार चंद्रकांत पाटील हे जावळेंसाठी अाग्रही हाेते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अायाेजित भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेला माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, अामदार सुजितसिंग ठाकूर, अामदार स्मिता वाघ, अामदार चंदुलाल पटेल, अामदार सुरेश भाेळे, अामदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, डाॅ. विजय धांडे, डाॅ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशाेक कांडेलकर, माजी अामदार हरिभाऊ जावळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित हाेते. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून मधुकर काटे, अजय भाेळे, पी. सी. पाटील, गाेविंद अग्रवाल, बाबुराव घाेंगडे, डाॅ. संजीव पाटील, पाेपट भाेळे, डाॅ. महेंद्र राठाेड, उदयभान पाटील, के. बी. साळुंखे, उद्धव माळी, दिलीप खाेडपे, कमलाकर राेटे, डी. एम. पाटील, पद्माकर महाजन, डाॅ. दीपक पाटील व माजी खासदार हरिभाऊ जावळे हे इच्छुक हाेते. यांच्यापैकी ९ जणांनी माघार घेतली तर ९ जणांना चर्चेसाठी एका खाेलीत एकत्रित बसवण्यात अाले. दीड तास चाललेल्या चर्चेनंतर ८ जणांनी माघार घेतल्याने हरिभाऊ जावळे यांची बिनविराेध जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली.
 

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा राजकीय प्रवास

हरिभाऊ जावळे यांनी चार वेळा रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यापैकी दाेन वेळा विधानसभेवर अामदार म्हणून निवडून अाले. तर दाेन वेळा लाेकसभा निवडणूक लढवली. त्यात दाेन्ही वेळा खासदार म्हणून निवडून अाले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. सध्या राज्याच्या कृषी व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती अाहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा हाेता अाग्रह
सत्ता नसताना पक्षात समन्वय राहावा म्हणून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. स्पर्धक वाढल्याने व कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने हरिभाऊ यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. परंतु, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा अाग्रह धरला हाेता. जावळेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवताच स्पर्धेतील अन्य इच्छुकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

नऊ महिन्यांत दुसऱ्यांदा...

  • लाेकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी १० एप्रिल २०१९ राेजी अमळनेरात भाजपच्या प्रचार सभेत माजी अामदार डाॅ. बी. एस. पाटील यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिवंगत उदय वाघ यांनी अशीच मारहाण केली हाेती.
  • त्या वेळीही तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी डाॅ. पाटील यांचा बचाव केला.
  • नऊ महिन्यांनंतर पुन्हा तसाच प्रकार घडला. या वेळीही महाजनांनीच मध्यस्थी केली.

हे माझ्यासमाेरच घडले. पक्षशिस्तीचे दाखले दिले जात असताना असे घडावे, हे दुर्दैव अाहे. कार्यकर्त्यांना निलंबित करावे, अशी शिफारस प्रदेशाध्यक्षांकडे करणार अाहे. -रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री शुक्रवारची घटना अत्यंत दुर्दैवी अाहे. नाराजी व्यक्त करण्याचा ताे मार्ग नव्हता. मी वरिष्ठांशी चर्चा केली अाहे. त्यांना रीतसर अहवाल पाठवून दाेषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. -गिरीश महाजन, माजी मंत्री पुन्हा पुन्हा असे प्रकार हाेत असल्याने ही प्रवृत्ती वाढता कामा नये. हा प्रकार करणाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्यांना पक्षातून हाकलून दिले पाहिजे. -एकनाथ खडसे, भाजप नेते.

हे ठरले असंतोषाचे कारण...

भुसावळ येथील शहर अध्यक्षांच्या निवडीत एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या प्रा. डाॅ. सुनील नेवे यांनी मनमानी करत बाहेरच्या व्यक्तीची निवड केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. ४० ते ५० कार्यकर्ते यासाठी व्यासपीठाखाली उभे राहून व्यासपीठावर असलेले मंत्री दानवे अाणि गिरीश महाजन यांच्यांशी चर्चा करत होते. यादरम्यान काही कार्यकर्ते व्यासपीठावर गेले. प्रा.नेवे समाेर दिसताच त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली.

खडसे अनुपस्थित...

एकनाथ खडसे शुक्रवारी काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यामुळे ते या जिल्हाध्यक्षपदासाठी आयोजित बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांचे समर्थक असलेल्या डॉ. नेवे यांच्यावरील राग कार्यकर्त्यांनी त्यांना काळी शाई फासत व मारहाण करून व्यक्त केला.
 

बातम्या आणखी आहेत...