Crime / कुटुंबावर जादूटोण्याचा आराेप; मारहाण करत टाकले वाळीत, जनावरांचे रक्तही पाजले

नाशिक जिल्ह्यातील माेऱ्हाळापाडाची घटना, एका महिन्यानंतरही पोलिसांकडून दखल नाही

प्रतिनिधी

Jun 15,2019 10:14:00 AM IST

सटाणा - जादूटोणा करून गावातील लोकांचे बळी घेतात, रोगराई पसरवतात या कारणावरून गमन लहानू अहिरे, पत्नी शांताबाई व चार मुलांना गावात बंदिस्त करून त्यांना विवस्त्र करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चांभारकुंडातील पाणी प्यायला लावले. जनावरांचे रक्त पाजले व संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले आहे. बागलाण तालुक्यातील मानूरच्या मोऱ्हाळापाडा येथे ही घडली आहे. यासंदर्भात संबंधित कुटुंबाने सटाणा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे १४ मे रोजी तक्रार केली असतानाही एक महिना उलटूनही पोलिसांनी गांभीर्याने या घटनेची दखल घेतली नाही.


अन्याय झालेल्या अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मोऱ्हाळापाडा येथे अहिरे कुटुंब शेती करते. मार्च २०१९ मध्ये गावात दोघांचे निधन झाले. तेव्हापासून तुम्ही माणसे मारता, असा आरोप करून गावातील शिवमन लहानू अहिरे यांच्यासह ३८ जणांनी आम्हाला हिणवायला सुरुवात केली. १९ मार्चला गावात सार्वजनिक ठिकाणी आम्हाला बोलावून नेले. तिथे सर्व कुटुंबीयांना विवस्त्र केले. हातपाय बांधून चाबकाचे फटके मारले. पाण्यात पादत्राणे भिजवून चांभारकुंडातले पाणी प्यायला लावले. रात्रभर आम्ही याच अवस्थेत यातना भोगत होतो. २० मार्चला ग्रामस्थांनी आम्हाला स्मशानभूमीत नेले. तेथे भगताने जनावरांचे रक्त पाजले. कवटी-हाडे आमच्यासमोर ठेवून भगताने मंत्र म्हटले. विनवण्या करूनही ग्रामस्थांना दया आली नाही. रात्री १२ वाजेपर्यंत स्मशानभूमीत बांधून ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांनी अघोरी अत्याचार केला आहे.

एका महिन्यानंतरही पोलिसांकडून दखल नाही
२१ मार्चला आम्हाला सोडून देण्यात आले. या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास जाळून टाकू, असा दमही संबंधितांनी दिला. कोऱ्या दस्तऐवजावर सह्या व अंगठे घेतले. गावाने आम्हास वाळीत टाकले असून धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. या घटनेबाबत पोलिस गंभीर नसल्याचाही कुटुंबीयांचा आरोप आहे.

X
COMMENT