अमळनेरात संताप : धरणाचे आश्वासन पूर्ण न केल्याने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

प्रतिनिधी

Apr 20,2019 10:48:00 AM IST

अमळनेर (जि.जळगाव) - सत्तेत येण्यापूर्वी दिलेले पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये लोकांच्या संतापाला सामाेरे जावे लागले. जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले व त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर िनदर्शने केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. याप्रकरणी १५ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ‘नाबार्ड’च्या निधीतून हे धरण पूर्ण करू, असे आश्वासन सभेत दिले.


निवडणुकीच्या प्रचारासाठी अमळनेरात मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी दुपारी २ वाजता जाहीर सभा झाली. त्यांचा ताफा मारवड रस्त्यावरून येत असताना पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ताफ्यासमोर निदर्शने सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी काळे झंेडेही दाखवले. पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले व त्यानंतर अटक केली.

पोलिस, प्रशासनाची तारांबळ
मुख्यमंत्र्यांपर्यंत पाडळसरे धरणाचा प्रश्न पोहोचावा व त्यांनी दखल घ्यावी यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर थांबले. ‘पाडळसरे धरण झालेच पाहिजे!’, ‘धरण आमच्या हक्काचे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांनी आंदोलकांना रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला, तर आंदोलकांनी धरणाची मागणी या वेळी जोरदारपणे लावून धरली. आंदोलनकर्त्यांना तत्काळ अटक करून पोलिस गाडीत टाकत पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दरम्यान, . “ही निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही असे महायुतीच्या मेळाव्यात जलसंपदामंत्र्यांनी सांगितल्याने भ्रमनिरास झाला होता. त्यामुुळे हे आंदोलन करावे लागले, असे समितीचे रणजित शिंदे यांनी सांगितले.

मारहाण झालेल्या ठिकाणीच झाली सभा
काही दिवसांपूर्वी अमळनेरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली होता. त्याच जागी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. या सभेला पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जिल्ह्यातीलच, तरीही उपोषण, जेल भरो केले
पाडळसरे धरणाचे काम गेल्या २० वर्षांपासून निधीअभावी रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षांत या धरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. विशेष म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्ह्यातील असूनही या धरणाकडे व धरणासाठी प्रदीर्घ काळ चाललेले उपोषण, जेल भरो, जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहेत.

म्हणून लोक संतापले...
मुख्यमंत्र्यांना भेटून जनआंदोलन समिती निवेदन देणार होती. मात्र, पोलिसांनी एक दिवस आधीच कोणतेही आंदोलन, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, आंदोलनात टोपी घालू नये, असे बजावले होते.

X
COMMENT