आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशाच्या हव्यासापोटी दोन हजारांतच देऊ लागले आयटीआय, बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र; 2 अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/बदनापूर- कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेतले. नंतर ऑपरेटर म्हणून एकाने खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. या नोकरीतून फोटोशॉप सर्व कमांडची परिपूर्ण माहिती झाल्यानंतर एका जणाने फोटो स्टुडिओही सुरू केला. परंतु नंतर जास्त पैशाच्या हव्यासापोटी दाेन हजार दिल्यानंतर तांत्रिक अभ्यासक्रमांच्या विविध ट्रेडचे बनावट प्रमाणपत्र फोटो स्टुडिओच्या आडून देण्याचा अनधिकृत व्यवसायच सुरू केल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. भगवान साहेबराव खांडेभराड व संतोष ज्ञानदेव मनभरे (रा. धोपटेश्वर, ता. बदनापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यात एक जण गरजवंत गिऱ्हाईक शोधून आणायचा, तर दुसरा फोटोशॉपमध्ये प्रमाणपत्र एडिट करून द्यायचा, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. 

 

कोणत्याही तांत्रिक अभ्यासक्रमाचे (ट्रेड) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण न घेता थेट राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण परिषदेचे (बोर्डाचे) बनावट प्रमाणपत्र बदनापूर येथील गुरुकृपा फोटो स्टुडिओमधून विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून गौर यांनी पथकाला आदेशित केल्यानंतर पथकाने सापळा रचून बदनापूर येथे गुरुकृपा फोटो स्टुडिओवर धाड टाकली. स्टुडिओचा चालक भगवान साहेबराव खांडेभराड, संतोष ज्ञानदेव मनभरे या दोघांना १ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेतले. जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात गुन्हे शाखेत दोघांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बनावट प्रमाणपत्र बनवून विक्री करत असल्याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी अनेकांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिषदेची (बोर्डाची) प्रमाणपत्रे बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष सावंत, समाधान तेलंग्रे, फुलसिंग घुसिंगे, फुलचंद हजारे, रंजित वैराळ, सदाशिव राठोड, रवी जाधव यांनी पार पाडली. या घटनेत शासनाच्या वतीने अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले. 

 

८० जणांना तयार करुन दिली बनावट कागदपत्रे 

बनावट प्रमाणपत्रे तयार करुन ती ८० जणांना विकली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत अजून एकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास जालना पाेलिस करत आहे. 

 

बनावट प्रमाणपत्रावर एक्सलंट, गुड असे दिले ग्रेड 
राज्य तंत्र शिक्षण संस्थेचे असलेले एक प्रमाणपत्र स्कॅन करून घेतले. या स्कॅनरमधून खऱ्या असलेल्या प्रमाणाच्या जागी सिरियल नंबर बदलण्यासह फोटो क्रॉप करून बनावट नाव टाकून दिले. त्या ठिकाणी ट्रेड टाकून कोणत्या वर्षी परीक्षा दिली, कॅरेक्टरमध्ये गुड, एक्सलंट असा महत्त्वपूर्ण ग्रेडही दिला. ट्रेड टेस्टमध्ये असलेले सोशल स्टडीज, प्रॅक्टिकल, ट्रेड थेअरी याबाबतही चांगले मार्क्स टाकून दिले गेले. रिझल्टचीही तारीख टाकून दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बदनापूर असा शिक्काही बनवण्यात आला होता. 

 

एलसीबीच्या कारवाईने पुढचे गुन्हे टळले 
एलसीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केलेल्या कारवाईमुळे पुढे होणारे गुन्हे टळले आहेत. या गुन्ह्यात अजून काय निष्पन्न होते याचा तपास सुरू आहे. पथकातील सर्वांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना. 

 

प्राथमिक स्तरावर तीन प्रमाणपत्रे जप्त 
प्राथमिक तपासात तीन जणांना दिलेले हे प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच हे बनावट प्रमाणपत्र करण्यासाठी लागणारा संगणक संच, कलर प्रिंटर, बनावट ग्राहकांसोबत दिलेली रक्कम असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनेकांना अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र दिल्याची माहिती आरोपींनी दिली.
 
प्रमाणपत्रावर क्रमांक हे बनावट असल्याचे निष्पन्न 
याबाबत पोलिसांनी आयटीआयमध्ये येऊन तीन नावांचे प्रमाणपत्र दिले असता ती तिन्ही नावे व त्या प्रमाणपत्रावर असलेला क्रमांक हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. बी. के. कुलकर्णी, प्राचार्य, आयटीआय, बदनापूर.