आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भातील मुलींचा कर्दनकाळ ठरला हिस्ट्रीशीटर डॉक्टर; 7 वर्षांत 5000 गर्भलिंग चाचण्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- मुलींचा गर्भातच गळा घोटणाऱ्या डॉ. महंमद इम्तियाज रंगरेज (४१) यास पोलिसांनी राजस्थानचा पहिला हिस्ट्रीशीटर डाॅक्टर घोषित केले आहे. त्याच्यावर गेल्या ७ वर्षांत जोधपूर जिल्ह्यातील पाच हजार गर्भलिंग चाचण्या केल्याचा आरोप आहे. त्याला जोधपूरच्या नागोरी गेट पोलिस ठाण्याचा हिस्ट्रीशीटर घोषित करण्यात आले आहे. डॉ. इम्तियाजला २०१६ मध्ये पहिल्यांदा गर्भलिंग चाचणी करताना पकडले होते. तेव्हा तो बालेसर सामान्य रुग्णालयाचा प्रभारी हाेता. त्याला तुरुंगवास झाल्यानंतर निलंबित करण्यात आले. परंतु तुरुंगातून सुटताच तो पुन्हा गर्भलिंग चाचणीच्या काळ्या धंद्यात गुंतला. तेव्हा वेगवेगळ्या काळात चार वेळा अटकही झाली होती. 

 

बाप-बेटे गर्भलिंग तपासणी व गर्भपाताच्या पॅकेजसाठी कुख्यात इम्तियाजने पहिल्यांदा अटक होण्याआधी त्याचे वडील डॉ. नियाझ यालाही गर्भलिंग चाचणी करण्याच्या आराेपाखाली अटक करण्यात आली होती. इम्तियाज व त्याचे वडील दोघेही गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करण्याचे पॅकेज घेत असत. यामुळेच पीसीपीएनडीटी सेलच्या वतीने इम्तियाजच्या विरोधात एफआयआर नोंदवून न्यायालयात कठोर कलमे लावण्यात आली आहेत. 


२०१६ मध्ये प्रथमच लिंग परीक्षण करताना अटक झाल्यानंतर इम्तियाजचे निलंबन कायम आहे. त्यानंतर त्याला तीन वेळा अटक झाली. परंतु आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बडतर्फ करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही. तज्ज्ञांच्या मते, विभागातील जबाबदार अधिकारी पोलिस प्रमुखाप्रमाणे आरोपीला १६ सीसीएनुसार आरोपपत्र ठेवून त्याला बडतर्फ करू शकतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, सिरोही जिल्ह्यातील हवालदार ओमप्रकाश बिष्णोई व रामलाल बिष्णोई हे दोघे निलंबित असताना, सांचौर भागात बनावट आरटीओ अधिकारी बनून अवैध हप्ते गोळा करत असल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. १७ डिसेंबर रोजी या दोघांना बडतर्फ करण्यात आले होते. हवालदार भूटाराम व ट्रक लुटण्याच्या प्रकरणात १२ मार्च रोजी अटक केली होती. त्याला काही महिन्यांपूर्वीच नोकरीतून बडतर्फ केले होते. बिकानेरहून जोधपूर तुरुंगात आणताना मांगीलाल याला पळवून लावल्याप्रकरणी गार्ड पप्पूराम बिष्णोई यास निलंबित केले होते. 

 

आता पोलिस ठेवणार नियमित लक्ष 
आता पोलिस इम्तियाजवर नियमित लक्ष ठेवू शकतील. पोलिसांच्या वेबसाइटवर तो हिस्ट्रीशीटर दिसेल. 

 

पहिल्यांदा ऑक्टोबर २०१६ मध्ये अटक 
प्रथम : ७ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. इम्तियाज त्याचा सहकारी भैरोसिंह याच्या घरी गर्भलिंग चाचणी करताना पकडला गेला होता. तेव्हा इम्तियाज बालेसर सरकारी रुग्णालयात प्रभारी होता. 
दुसरी वेळ : २१ मे २०१७ रोजी इम्तियाजने दलाल हनुमान ज्याणीच्या घरी त्यांच्या साथीदार संजय त्यागी, सोहन जाट, राजूमार्फत गर्भवतीला बोलावले. तपासणी करून मुलगी असल्याचे सांगितले. 
तिसरी वेळ : ५ जानेवारी २०१८ रोजी इम्तियाजच्या टोळीने एका गर्भवतीला आधी झुंझुनूंनंतर सिकर, पुन्हा नागोर व नंतर जोधपूरला बोलावले. रेल्वेस्थानकाजवळ धावत्या गाडीत तिला तपासले. पण तो पकडला गेला. 
चौथी वेळ : ९ सप्टेंबर २०१८ रोजी डाॅ. इम्तियाज यास दलाल फतेहकिशनसोबत महामंदिराजवळील एका घरात गर्भवतीच्या गर्भातील लिंग चाचणी करताना पकडले. दलाल फतेहकिशन फरार झाला. 

 

पोलिसांप्रमाणे १५ सीसीएनुसार आरोपपत्र देऊन बडतर्फ करता येते 
महंमद इम्तियाज गेल्या दोन वर्षांत निलंबित राहूनही तीन वेळा गर्भलिंग चाचणी करताना पकडला गेला. परंतु सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले नव्हते. डॉक्टरचे नोंदणी प्रमाणपत्रही कायम आहे. डॉ. इम्तियाज यास पहिल्यांदा अटक करणारे पीसीपीएनडीटी सेलचे एएसपी रघुवीरसिंग यांनी सांगितले, त्याने ७ वर्षांत ५ हजार भ्रूणांचे लिंग परीक्षण केले आहे. त्यामुळेच त्याच्या गुन्हेगारी वृत्तीला पायबंद घालण्याचा निर्णय घेतला. 

 

डॉक्टरच्या रूपात हैवान झालेल्या इम्तियाजवर उपचार पोलिसात डीसीपी असलेल्या एका डॉक्टरने केला 
जोधपूरमधील डीसीपी अमनदीपसिंह कपूर यांनीच पुढाकार घेऊन महंमद इम्तियाजला हिस्ट्रीशीटर घोषित केले. डीसीपी अमनदीपसिंह यांनी स्वत: डॉक्टरची पदवी घेतलेली आहे. ते म्हणाले, इम्तियाज लिंग चाचणी करून अवैध गर्भपात करत होता. त्याच्याविरोधात न्यायालयात चार केस प्रलंबित आहेत. तरीसुद्धा त्याने हा उद्योग सोडला नाही. त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. आम जनतेच्या सुरक्षेसाठी त्याला हिस्ट्रीशीटर घोषित करणे आवश्यक होते.