आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस डॉक्टर नईमोद्दीन शेखचे सिल्लोड तालुक्यात अंभईतही सुरू होते हॉस्पिटल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद. बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याच्या संशयावरून अटकेत असलेला डॉ. नईमोद्दीन रफिक शेख हा बोगस डॉक्टर औरंगाबादमध्ये रोशनगेट परिसरात आणि सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे आपल्या बोगस डिग्रीवर खुलेआम हॉस्पिटल चालवत असल्याचे 'दिव्य मराठी'ने केलेल्या पडताळणीत आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर डॉ. शेख याची मेडिकल प्रॅक्टिशनर्ससाठी असलेली नोंदणीही बोगस निघाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्याने आपल्या हॉस्पिटलवर टाकलेले ३७९५ आणि ३८०२ हे दोन्ही रजिस्टर्ड नंबरही बोगस आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदीनुसार या दोन्ही रजिस्टर्ड नंबरवर अनुक्रमे डॉ. सत्यपाल मेहता आणि डॉ. घनश्याम पाटीदार हे दोघे एमबीबीएस डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिस करत आहेत. 
'दिव्य मराठी'ला मिळालेल्या माहितीनुसार नईमोद्दीन रफिक शेख या बोगस डॉक्टरने या पूर्वी अजिंठा, फर्दापूर येथेही दुकान थाटले होते. तेथेही त्याने अनेक निष्पाप जिवांशी खेळल्यानंतर अंभई येथे नॅशनल हॉस्पिटल तसेच नॅशनल मेडिकल आणि जनरल स्टोअर्स थाटले. त्याबरोबरच तो औरंगाबादेत न्यू लाइफ हॉस्पिटल उघडले. हे दोन्ही हॉस्पिटल तो एकाच वेळी चालवायचा. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस तो अंभईच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये थांबायचा. 

 

रुग्णाच्या मृत्यूनंतर नईमोद्दीन शेख फर्दापूर परिसरातून पसार 
२ ऑगस्ट १९९९ रोजी फर्दापूर येथे कापड दुकानदार मोहंमद इस्माईल मोहंमद मोसीन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या नातलगांनी त्यांना तेव्हा फर्दापुरात प्रॅक्टिस करत असलेल्या डॉ. नईमोद्दीन रफिक शेखच्या रुग्णालयात नेले. 

 

मात्र डॉ.शेख याला याचे निदानच करता आले नाही. उलट त्याने मोहंमद इस्माईल मोहंमद मोसीन यांना रात्री बर्फाच्या पाण्याने अंघोळ घातली. तसेच अन्न पचन करण्यासाठी वापरले जाणारे जेलोसिल या औषधाची पूर्ण बॉटल पाजून अघोरी उपचार केले. 

 

त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. डॉ. शेख याच्या हलगर्जीपणामुळेच मोहंमद इस्माईल मोहंमद शेख यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत मृताचे नातलगांनी डॉ. शेख यास मारहाण केली. नातलगांच्या भीतीने रात्रीतून डॉक्टर फर्दापुरातून निसटला त्याने अंभईत हॉस्पिटल थाटले. 

 

आतापर्यंत ९ आरोपी 
'दिव्य मराठी' आणि मनपाच्या आरोग्य विभागाने २२ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंगमध्ये अवैधपणे सोनोग्राफी सेंटर थाटून गर्भलिंग निदान करणारा डॉ. सूरज सूर्यकांत राणा, त्याचा मदतनीस गणेश गोडसे आणि गर्भलिंग निदान चाचणीसाठी महिलेला आणणारे ज्ञानेश्वर लोंढे, राहुल गोरे, कारभारी हिवाळे असे पाच जण पकडले गेले. राणाने पोलिस कोठडीत असताना दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी नईमोद्दीन शेख, डाॅ. सुनील पोते, लॅब टेक्निशियन राजेंद्र सावंत आणि त्यानंतर वर्षा शेवगण-राजपूत या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

 

चक्रावून टाकणारी साखळी 
दिव्य मराठीने केलेल्या स्टिंगनंतर पोलिस तपासात केवळ नऊच चेहरे समोर आले आहेत. मात्र गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची मोठी साखळीच शहर आणि जिल्ह्यात कार्यरत आहे. वाळूज येथील एक परिचारिका नियमितपणे डॉ. सूरज राणाकडे महिलांना गर्भलिंग निदानासाठी घेऊन येत होती. ही परिचारिका पूर्वी डॉ. राणा चालवत असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. वाळूजमधील एका रुग्णालयातूनही गरोदर महिलांना या परिचारिकेसोबत गर्भलिंग निदानासाठी पाठवले जात होते. 

 

रजिस्ट्रेशनही बोगस 
नईमोद्दीन शेख याने आपल्या हॉस्पिटलवर B. A. M. S. M.D. (AM) Regd. Med. Pract. (Bom) अशी पदवी लिहून रजिस्ट्रेशन नंबर ३७९५, ३८०२ असा लिहिला आहे. वास्तविक बॉम्बे अर्थात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदीप्रमाणे हे दोन्ही रजिस्टर्ड नंबर दुसऱ्याच डॉक्टरांच्या नावे रजिस्टर्ड आहेत. पहिले रजिस्ट्रेशन मंदसौर (मध्य प्रदेश) येथील सत्यपाल मेहता यांच्या नावे तर दुसरा रजिस्ट्रेशन नंबर नवी दिल्लीतील घनश्याम पाटीदार यांच्या नावे आहे. 

 

शेखच्या गोरखधंद्याचा प्रवास 
नईमोद्दीन शेख याने अवैध मेडिकल प्रॅक्टिससाठी सिल्लोड तालुकाच निवडला. 'दिव्य मराठी'ला मिळालेल्या माहितीनुसार त्याने सर्वप्रथम कायगाव, नंतर अजिंठा, फर्दापूर, अंभई आणि शेवटी औरंगाबाद आदी ठिकाणी बेकायदेशीरपणे हॉस्पिटल थाटली. 

 

महिलेला पाठवणारा डॉक्टर कोण? 
डॉ. सूरज राणा याच्याकडे गर्भलिंग निदानासाठी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील गर्भवती महिलेला कोणत्या डॉक्टरने पाठवले, याचा उलगडा अजूनही झालेला नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...