Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Bogus Hospital in Cidco Nashik

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती वेदनाकाळातही गर्भवतीची हेळसांड; मोरवाडी स्वामी समर्थ रुग्णालयातील प्रकार

प्रतिनिधी | Update - Dec 21, 2018, 10:22 AM IST

मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालय महिला रुग्णांना नेहमीच प्रतीक्षा करावी लागते.

 • Bogus Hospital in Cidco Nashik

  सिडको- मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून महिला व ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. येथील अनेक आरोग्य तपासणी करण्याच्या यंत्रणा बंद आहेत तर काही उपलब्धच नाहीत. बुधवारी प्रसूती वेदनाकाळात एका महिलेची सोनोग्राफीसाठी प्रचंड हेळसांड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

  मोरवाडी स्वामी समर्थ रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. मात्र, कमी असल्याचे कारण देत नियोजन वाऱ्यावर वरात असल्याचे दिसते. सिडकोतील एक महिला तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात आली असता तिला प्रसूतीकाळाची वेदना होत असताना सोनोग्राफी करणे गरजेचे होते. मात्र, 'या ठिकाणी मशीन बंद आहे, नवीन उपलब्ध नाही' असे कारण देत डॉक्टरांनी या महिलेस उडवाउडवीची उत्तरे देत बेजबाबदारपणाचा कळस गाठला. यामुळे वेदना होत असतानाही महिलेला दोन ते तीन रुग्णालये फिरावी लागली. एकीकडे वेदना व दुसरीकडे हेळसांड यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथे अनेकवेळा रुग्णांना औषधे मिळत नाहीत. त्यांना खासगी मेडिकलमधून औषधे घ्यावी लागतात. एकीकडे शासन आरोग्यासाठी अनेक उपाययोजना राबवित असल्याचे दाखवून देत असताना मोरवाडी रुग्णालयाचा कारभार मात्र अाजमितीस रामभरोसे सुरू असून, परिसरातील लोकप्रतिनिधींनाही याचे गांभीर्य जाणवत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

  कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन :
  येथील कर्मचाऱ्यांचे रुग्णांशी अतिशय उद्धट वर्तन सुरू असते. अनेक कर्मचारी ज्येष्ठ नागरिक व महिलांना अरेरावीची भाषा करतात. आजारपणामुळे रुग्ण त्रस्त असताना कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. महिला आरोग्यसेविका, वार्डन यांची बोलण्याची भाषा अतिशय उद्धट असल्याचे काही महिलांनी सांगितले.

  हा प्रकार निंदनीयच
  महिलेला प्रसूती वेदना होत असताना मोरवाडी रुग्णालयात घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. रुग्णालयातील अनेक उपकरणे बंद आहेत. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना तासन‌्तास रांगेत उभे रहावे लागते. येथील कारभार त्वरित सुधारावा, अन्यथा महिला तीव्र आंदोलन करतील. - डॉ. योगिता हिरे, अध्यक्षा, महिला विकास बँक

  नियोजनाचा अभाव
  सिडकोतील लोकसंख्येच्या मानाने रुग्णालयाची जागा कमी पडते, शिवाय डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत याेग्य नियोजन केल्यास कारभार सुधारू शकतो. मात्र ना लोकप्रतिनिधींना गांभीर्य, ना येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना. यामुळे रुग्णांची फरफट सुरूच अाहे. रुग्ण बरा होण्याऐवजी जास्तच आजारी होऊन अखेर खासगी रुग्णालयांची वाट धरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Trending