आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या तपासणीविनाच बोगस पीयूसी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या 'पीयूसी' (पोल्युशन अंडर कंट्रोल) केंद्रांवर सर्रास बोगस पीयूसी प्रमाणपत्र विकले जात असल्याचे चित्र आहे. शहरातील काही पीयूसी केंद्रावर पाहणी केली असता त्याठिकाणी वाहन न बघता तसेच कोणत्याही प्रकारची रीडिंग न पाहताच चक्क महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी परवाने दिलेली ही केंद्रेच प्रदूषणास हातभार लावत असल्याचे चित्र आहे. 

 

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषणातही माेठ्या प्रमाणात वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील काही ठिकाणी पीयूसी केंद्रांना परवाने दिले आहेत. दर सहा महिन्याला सर्व वाहनांना पीयूसी चाचणी करणे बंधनकारक आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे किंवा नाही, यासाठी ही चाचणी केली जाते. त्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड व हायड्रोकार्बन या विषारी वायूंचे प्रमाण तपासले जाते. त्यासाठी परिवहन कार्यालयामार्फत परवाने देण्यात आलेली पीयूसी केंद्रे शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारची चाचणी करतात. मात्र, या चाचणीबाबत केंद्रचालकांनाच गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. शहरातील वेगवेगळ्या काही पीयूसी केंद्रांवर चारचाकी व दुचाकीची प्रदूषण चाचणी करण्यासाठी गेलो असता काही केंद्रावर कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रो कार्बनच्या प्रमाणात तफावत आढळून आली. तसेच एका केंद्रावर पीयूसी मशिनमधील रीडिंग न पाहताच प्रमाणपत्रावर नोंद करण्यात आली. एका केंद्रावर तर चक्क कोणत्याही वाहनांची तपासणी न करताच 'केवळ वाहनांच्या नंबर सांगा आणि पैसे द्या' असे सांगत चक्क महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे समोर आले. 

 

शंभर प्रमाणपत्र दररोज विकतो 
मानव उथान मंचचे पदाधिकारी जस्बीर सिंग यांनी शहरातील एका पीयूसी केंद्रावर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्र काढण्यासाठी किती पैसे लागणार असे विचारले असता एका प्रमाणपत्राचे शंभर रुपये होणार असल्याचे सांगण्यात आले. तर, जस्बीर यांनी पैसे कमी करण्याचे सांगितले असता 'माझ्याकडून एक व्यक्ती दररोज शंभर पीयूसी घेवून जातो, त्याला मी कमी करत नाही तर तुम्ही तर दोनच वाहनांचे घेत आहे', असे उत्तर केंद्रचालकांकडून देण्यात आले. 

 

एकच नावाची अनेक केंद्र, आरटीओचे दुर्लक्ष 
शहरात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील 'पीयूसी'' प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. त्यासाठीची अधिकृत केंद्रे ठिकठिकाणी सुरू आहेत. मात्र, शहरातील सिडको, सातपूरसह शहरातील काही भागात एकाच नावाने एकाहून अधिक ठिकाणी फिरते 'पीयूसी'' केंद्र सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. हे सर्व प्रकरण गंभीर असताना याकडे आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...