आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये बोगस मतदानाचा आक्षेप; मुदखेडमध्ये दोन गटांत हाणामारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शहरातील बालेपीर भागातील एका मतदान केंद्रावर काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आले असल्याचे सांगत दोन संशयित मतदारांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदार होत असल्याचा आक्षेप घेतला. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, पोलिस चौकशीत त्या दोन्ही मतदारांची नावे मतदार यादीत नोंदली गेली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
काका जयदत्त क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील लढतीमुळे बीड विधानसभा मतदार संघात सोमवारी मतदानादरम्यानही पुतणे संदीप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. दुुपारी १ वाजता बीड शहरातील बालेपीर भागातील मतदान केंद्रावर काही मतदारांवर राष्ट्रवादीच्या बूथ प्रतिनिधींनी आक्षेप घेत हे स्थानिक रहिवासी नसल्याचे सांगितले. बोगस मतदान होत असल्याची माहिती या प्रतिनिधींनी उमेदवार संदीप क्षीरसागर यांना दिली. त्यांनीही मतदान केंद्रावर धाव  घेत कार्यकर्त्यांनी मतदानापासून रोखलेल्या दांपत्याची कानउघाडणी केली. याची व्हिडीओ क्लिपही समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाली.  यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.  अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत दांपत्याची चौकशी केली. त्यांची नावे त्या मतदान केंद्राच्या यादीत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना सोडून दिले. 
 

रोही पिंपळगावात दोन गटात हाणामारी 
नांदेड | भोकर मतदार संघातल्या मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव तांड्यात मतदान बुथवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात पाच जण जखमी झाले. सुनील भगवान शिंदे (२४), भागवत शेषराव शिंदे (२४), शिवहारी बालाजी शिंदे (२३), माधव साहेबराव शिंदे (३२), माधव गणपती शिंदे (४९) रा. वसंतवाडी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमी झालेले भाजप समर्थक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

देगलूरला वंचितचे उमेदवार प्रा. रामचंद्र भराडे यांना अज्ञात जमावाची मारहाण 
नांदेड | देगलूर मतदार संघातील वंचित आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या गाडीवर दुपारी चेनपूर येथे अज्ञात लोकांनी हल्ला केला. यावेळी गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या अंगावरील कपडेही फाडण्यात आले. या घटनेचा वंचित आघाडीने तीव्र निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.  दरम्यान किनवट मतदार संघातील पिंपळशेंडा येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावातील २९९ पैकी केवळ २१ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. नदीवर पूल नाही. त्यामुळे या गावातील लोकांना विदर्भातून गावात जावे लागते.