आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नंदिता दास
मुंबई - मुंबईत एक आणि दोन फेब्रुवारीला “मुंबई कलेक्टिव्ह’ परिषद झाली. ‘सेलिब्रिटी फ्रीडम अँड प्ल्युरॅलिटी’ ही यंदाची थीम होती. या परिषदेत ‘सेलिब्रिटी अगेन्स्ट कम्युनॅलिझम’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याच विषयावर अभिनेत्री नंदिता दास यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडलेली ही भूमिका...
बॉलीवूडचे कलाकार भूमिका घेत नाहीत अशी ओरड असते, पण त्यात तथ्य नाही. अनेक कलाकार आता बोलू लागले आहेत, पण बरेच गप्पही आहेत. त्यांच्या गप्प बसण्यामागे दोन कारणं आहेत - काहींना भीती वाटते, तर काहींचा राजकारणासाठी दुरुपयोग सुरू आहे. चित्रपटांवर बंदीची मागणी होते, पोस्टर्स फाडली जातात, पुस्तकं जाळली जातात. खरं तर या आंदोलनकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत, कारण समाजमनावर कला किती प्रभाव टाकू शकते हेच ते सिद्ध करतात.
खरं तर चित्रपट, कथा या वास्तवाचे प्रतिबिंब असतात. जनमत बदलण्याची ताकद त्यांच्यात असते. मी स्वत: हा अनुभव घेतला आहे. १९८९ मध्ये सफदर हाश्मींची हत्या झाली त्या वेळी आणि १९९८ मध्ये फायर चित्रपटाला विरोध झाला तेव्हा कलाकार, लेखक, पत्रकार रस्त्यावर उतरले होते. दुनिया बदलेल या आशेने आम्ही कॉलेजमध्ये पथनाट्य करत होतो. आजही आमच्यातील अनेक जण आदर्शवादी आहेत. सोशल मीडिया हे निश्चितच व्यक्त होण्याचे साधन आहे, परंंतु तुरळक शब्दांच्या मर्यादेत टोकाच्या भूमिका मांडण्यापलीकडे करड्या छटा मांडण्यात ते तोकडे पडतेय. अशा वेळी स्वतंत्र व लोकशाहीवादी भारताची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यात कला आणि कलाकार हेच महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, याबाबत मी आशावादी आहे.
आज देशाची संवैधानिक मूल्ये धोक्यात आली असताना त्यांच्या संरक्षणासाठी आंदाेलन करणाऱ्या हजारो युवकांना मी सलाम करते. आपली राज्यघटना व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली असताना, सध्या समूहवादी राजकारणाचे आव्हान संकट बनून देशापुढे उभे आहे. याविरोधात आवाज उठवणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मंच आणि प्रत्येक कृती महत्त्वाची आहे. लोकांच्या घटनात्मक हक्कांसाठी सुरू असलेल्या या प्रत्येक बिंदूला एकत्र जोडण्याची गरज आहे. ही एक दीर्घ पल्ल्याची मॅरेेथॉन आहे. यात मुंबई कलेक्टिव्हसारखे मंच महत्त्वाचे योगदान देत आहेत.
आज मंटो असते तर...
आज मंटो असते तर रागाने म्हणाले असते, सत्तर वर्षांत तुम्ही काहीच नाही शिकलात! आपल्या देशाने धर्माच्या नावावर सर्वात मोठे विस्थापन पाहिले, हिंसा पाहिली, खूप काही सहन केले.अन्यायाविरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे, बोललं पाहिजे. मंटो चित्रपटाचा शेवट मी फैज अहमद फैज यांच्याच ओळींनी केला आहे. त्याच ओळी आजच्या काळासाठीही समर्पक आहेत. ते म्हणतात - बोल के लब आजाद हैं तेरे, बोल जुबान अब तक तेरी है!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.