व्यवसायासोबत गरिबांना मदत करण्याच्या उद्देशातून एक जोडी पायमोजे विक्री झाल्यास एक जोडी दान करते बोम्बाज नावाचे स्टार्टअप

ऑक्टोबर 2013 मध्ये सुरू केला व्यवसाय, 700 कोटींचा महसूल

दिव्य मराठी

Apr 23,2019 10:55:00 AM IST

न्यूयॉर्क - अनेक लोकांना त्यांच्या कपाटात ठेवलेल्या सॉक्स (पायमोजे) चे महत्त्व नसते. मात्र, अमेरिकेत बोम्बाज नावाच्या स्टार्टअपचे संस्थापक डेव्हिड हीथ (३६) आणि रँडी गोल्डबर्ग (४०) यांच्यासाठी हा केवळ एक व्यवसायच नाही तर या माध्यमातून ते लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी मदतही करतात. २०१३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या त्यांच्या स्टार्टअपला अमेरिकेतील बिझनेससंबंधी रिअॅलिटी टेलिव्हिजन सिरीज “शॉर्क टँक’चे अभिनेते डेमंड जॉन यांचेही समर्थन आहे. हीथ आणि गोल्डबर्ग यांच्या कामाचा एक भाग झाल्याने मला वास्तवात आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोम्बाजच्या बिझनेस मॉडेलमध्ये व्यवसायासोबतच समाजसेवाही होत आहे. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्स तयार करते. या सॉक्सची एक जोडी विक्री झाल्यावर एक जोडी सॉक्स गरिबांना दान केले जातात.


बोम्बाजचे सीईओ डेव्हिड हीथ सांगतात की, ‘बोम्बाजच्या बिझनेसमधील “दान’ हा मुद्दा नंतर जोडण्यात आलेला नसून ही आधीपासूनचीच कल्पना होती. २०११ मध्ये मी एक फेसबुक पोस्ट वाचली होती, त्यात बेघरांच्या शिबिरात सर्वाधिक सॉक्स दान करण्याची विनंती करण्यात आली होती. मी ज्या वस्तूचा विचार करण्यासाठी केवळ काही सेकंदांचाच वेळ देतो, तीच वस्तू गरिबांसाठी लक्झरी ठरते, ही किती दु:खद बाब आहे.’


त्या वेळी हीथ आणि गोल्डबर्ग एका मीडिया स्टार्टअपमध्ये काम करत होते. त्यांनी त्यांचा हा विचार मित्रांना सांगितला. त्या वेळी बाय वन गेट वनची चांगलीच चलती होती. त्या वेळी जर सॉक्सच्या व्यवसायात उतरलो तर गरिबांची सेवा करण्याची चांगली संधी मिळेल हा विचार आला. बोम्बाजचे मुख्य ब्रँड अधिकारी गोल्डबर्ग यांनी सांगितले की, आम्ही एकत्र सॉक्स कंपनी सुरू करू असा कधी विचारही केला नव्हता. मात्र, आम्हाला सॉक्सचे एक प्रकारचे वेड लागले होते. आम्ही बाजारात उपलब्ध असलेले जवळपास सर्वच प्रकारचे सॉक्स पाहिले. त्यातून लक्षात आले की, अनेक लोकांना सॉक्स घातल्यास अवघडल्यासारखे वाटते. त्याच वेळी या सॉक्सला अधिक चांगले करण्यावर आम्ही काम केले. त्यातूनच बोम्बाजची सुरुवात झाली.’


सुरुवातीला बोम्बाज केवळ गुडघ्यापर्यंत असलेल्या सॉक्सची विक्री करत होती. व्यवसाय वाढल्यावर सर्व प्रकारच्या सॉक्सचे उत्पादन सुरू केले. यात गुडघ्यापर्यंतचे आणि अॅथलेटिक्स सॉक्सचाही समावेश आहे. अमेरिकेत बोम्बाजच्या पुरुषांसाठीच्या एक जोडी सॉक्सची किंमत ८३२ रुपये आणि महिलांसाठीच्या एक जोडी सॉक्सची किंमत ७२८ रुपये आहे. बोम्बाज केवळ सॉक्सच नाही तर टी-शर्टचेही उत्पादन करत आहे. यातून गरिबांना मदत करण्याचा उद्देश आहे. आता कंपनी अपॅरल श्रेणीमध्येही उत्पादन लाँच करण्याचे नियोजन करत आहे.


क्राऊड फंडिंगने ३० दिवसांत १० लाखांचे उद्दिष्ट होते, २४ तासांमध्येच १७ लाख मिळाले
२०१३ मध्ये हीथ व गोल्डबर्ग यांनी नोकरी सोडली होती. क्राऊड फंडिंग वेबसाइट इंडिगोच्या माध्यमातून पैसे जमवण्याचे अभियान सुरू केले. सुरुवातीला त्यांनी ३० दिवसांत १० लाख रुपये जमवण्याचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, पहिल्या २४ तासांतच १७ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमवली. एकूण बोम्बाजला ९७ लाख रुपये क्राऊड फंडिंग मिळाले. या रकमेसह ऑक्टोबर २०१३ मध्ये व्यवसायाला सुरुवात केली. २०१४ मध्ये मित्र-कुटुंबीयांकडून ७ कोटी जमवले. एबीसीवर प्रसारित होणाऱ्या रिअॅलिटी शो शार्क टँकमध्ये दोघे सहभागी झाले.

X