• Home
  • Sports
  • Boxer Devika Ghorpade wons gold medal in Khelo India Youth Competition

नृत्याचा आविष्कार करणारी / नृत्याचा आविष्कार करणारी पावले वडिलांच्या आवडीमुळे रिंगमध्ये; आता गुरूच्या स्वप्नपूर्तीसाठी ऑलिम्पिकचा पल्ला गाठण्याचे ध्येय

Jan 19,2019 10:00:00 AM IST

पुणे- सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचा अप्रतिम आविष्कार करणारी पावलं ही केवळ वडिलांच्या आवडीमुळे बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये वळली आहे. यातील मेहनतीच्या बळावर गोल्डन पंच मारून खेलो इंडिया यूथ गेममध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला, हा संघर्षमय प्रवास आहे पुण्यातील प्रसिद्ध नृत्यांगना आणि १३ वर्षीय बाॅक्सर देविका घोरपडेचा. तिने अव्वल कामगिरीच्या बळावर शुक्रवारी गोल्डन पंच मारला. यासह ती महिलांच्या गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. हरियाणाच्या बॉक्सर सोबत सुवर्णपदकासाठी रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पुण्याच्या देविकाने आक्रमक खेळ करत शुकवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुण्याच्या देविकाला लहानपणापासून नृत्य करायचा छंद होता. त्यातूनच तिने राज्यस्तरीय स्पर्धेतही आपले नृत्याचे कौशल्य सिद्ध केले. मात्र वडिलांच्या आवडीमुळे ती बॉक्सिंगमध्ये वळली. विशेष म्हणजे तिचे प्रशिक्षक व ऑलिम्पियन मनोज पिंगळे यांचे हुकलेले सुवर्णपदकाचे स्वप्न आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवून पूर्ण करायचे असल्याचे तिने ध्येय निश्चित केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये खेलो इंडियात बॉक्सिंगचे सामने रंगले. या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष होते ते १३ वर्षीय बॉक्सर देविकाच्या १७ वर्षांखालील गटातील ४६ किलो गटाच्या फायनलकडे.

काही वर्षांपूर्वी देविकाही उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखली जात होती. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेंत तिने सोनेरी यश मिळवले होते.मात्र तिने खेळांमध्ये करिअर करावे. अशी वडिलांची इच्छा होती. २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकच्या वेळी तिने टीव्हीवर अॅथलेटिक्स, बॉक्सिंगचे सामने पाहिले, अन् तेथूनच देविकाचा क्रीडाक्षेत्रातीलद्वार खुले झाले. मुळची कोल्हापूरची असलेली देविका पुण्यात स्थायिक झालेली आहे. दोन वर्षांपासून ती बॉक्सिंगच्या मैदानात उतरली आणि सुवर्णपदक पटकावले.

ऑलिम्पियन गुरूचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू
इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेणारी देविका ही माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. काही वर्षांपूवी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रशिक्षक पिंगळे यांचे सुवर्ण अपूर्ण राहिले होते. आपल्या प्रशिक्षकांचे ऑलिम्पिकमध्ये अपूर्ण राहिलेले सुवर्ण मिळण्याचे देविकाचे ध्येय असून यादृष्टीने तिने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहे.

खेळात आक्रमतेसाठी करते वयोगटातील मुलांसोबत सराव
बाॅक्सिंगमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर आक्रमण करत गुण मिळवण्याचा खेळाडू प्रयत्न करत असतो. आपल्याही खेळात अधिक आक्रमकता यावी, तसेच अधिकच ताकद वाढावी यासाठी देविकाही आपल्या गटातील मुलासोबत बॉक्सिंगचा सराव करते. याच सरावामुळे खेळात अधिक मदत होत असल्याची प्रतिक्रिया चॅम्पियन देविकाने दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली.

X