Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | boy killed by train while listening songs in earphones

हेडफोनवर गाणे ऐकणारा तरुण रेल्वेच्या धडकेत ठार

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 04:02 PM IST

सकाळपासूून सायंकाळपर्यंत त्याने दुकान सांभाळले

  • boy killed by train while listening songs in earphones

    औरंगाबाद- कानात हेडफोन लावून गाणे ऐकत रेल्वे रुळांवरून पायी घरी जाताना रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर ही घटना घडली. प्रियंश श्यामराव काळे (१७, रा. राजमातानगर) असे मृृताचे नाव आहे. प्रियंशच्या वडिलांचे रेल्वेस्थानकाजवळ किराणा व स्टेशनरीचे दुकान आहे. सकाळपासूून सायंकाळपर्यंत त्याने दुकान सांभाळले. वडील दुकानावर आल्यावर तो घराकडे निघाला व ही दुर्दैवी घटना घडली.


    प्रियंश अकरावीचे शिक्षण घेत होता. वडिलांंना तो दुकानाच्या कामात मदतही करायचा. सकाळी दुकान उघडण्यापासून आवश्यक ती सर्व जबाबदारी तो पार पाडायचा. १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे त्याने दुकान उघडले व दुकानात बसला. वडील सायंकाळी दुकानावर आले. दिवसभर दुकानात असलेल्या प्रियंशला 'तू घरी जाऊन आराम कर', असे त्यांनी म्हटले. प्रियंशने वडिलांना दुचाकी मागितली. पण किराणा साहित्य आणण्यासाठी बाजारात जायचे असल्याने त्यांनी त्याला पायी जाण्यास सांगितले. त्यामुळे कानात हेडफोन लावत गाणी ऐकत तो रेल्वे रुळांच्या जवळून घराकडे निघाला. त्याच वेळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेेने रेल्वे भरधाव वेगात निघाली. प्रियंशला रेल्वे जवळ आल्याचे कळलेच नाही. जेव्हा त्याच्या लक्षात आले तोपर्यंत वेळ गेली होती. त्याने तत्काळ बाजूला होण्याचा प्रयत्न केला. रुळांवरून उडी घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला जोरात धडक बसली व प्रियंश जागीच ठार झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक एस. के. घुनावत करत आहेत.


    दिवसभर दुकान सांभाळून सायंकाळी जात हाेता घरी
    प्रियंशच्या कानात हेडफोन होता. त्यामुळे तो गाणी ऐकत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळेच त्याला गाडीचा आवाज आला नाही किंवा रेल्वे दुसऱ्या रुळांवरून जाईल, असे त्याला वाटले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रियंश जालन्याच्या दिशेने पायी जात होता, तर रेल्वेही याच दिशेने धावत होती. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील लोकांनी ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्याला दगडही मारले, परंतु दगड त्याच्यापर्यंत पोहोचले नाही व ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी हेडफोन सापडले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Trending