आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक, पवार-ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा, शिवसेना-राष्ट्रवादीची यादी तयार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु काँग्रेसची यादी अजूनही तयार झाली नसल्याने हा विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दीड तास चर्चा झाली. यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याला दुजोरा दिला नाही.

२४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे नागपूर अधिवेशनातच ठरले हाेते. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'आमची यादी तयार असून राष्ट्रवादीची यादी तयार नसल्याने विस्तार लांबणीवर पडला,' असे सांगितले हाेते. तर मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसची यादी तयार नसल्याचे सांगितले हाेते. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले अाहे.

काँग्रेसचे नेते सोमवारी नवी दिल्लीत मंत्र्यांची यादी घेऊन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे गेले. बातमी देईपर्यंत काँग्रेसच्या यादीला मंजुरी मिळाली नव्हती. पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामील व्हायचे आहे. परंतु त्यांना प्रदेशाध्यक्षपद द्यावे असा सूर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी लावला आहे. त्यामुळे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ शपथविधी आहे का, असे राजभवनवरील अधिकाऱ्याला विचारले असता अशी कोणतीही सूचना आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.