आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालासोपारा स्‍फोटक प्रकरण: जळगावमधून अटक केलेल्या दाेघांना १७ सप्टेंबरपर्यंत काेठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- नालासाेपारा येथील स्फाेटक प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथून अटक करण्यात अालेल्या संशयितांना रविवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात अाले. न्यायालयाने या दाेघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून काही शस्त्रे व बाॅम्ब जप्त करून वैभव राऊतला अटक केली हाेती. नंतर याच प्रकरणात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. तर ६ सप्टेंबर रोजी साकळी येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी यालाही अटक करण्यात अाली हाेती. या प्रकरणात अटक केलेल्या अाराेपींचा मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याचा आरोप एटीएसने केला आहे. 


साकळीतून ज्वालाग्राही पदार्थ केले जप्त 
एटीएसकडून न्यायालयात देण्यात अालेल्या माहितीनुसार, साकळी गावातून ताब्यात घेण्यात आलेल्या विजय ऊर्फ भय्या लोधी याच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, ३ मोबाइल, ४ पेनड्राइव्ह व दुचाकीच्या काही नंबर प्लेट जप्त करण्यात अाल्या. वासुदेव सूर्यवंशीकडून १ डीव्हीडी व २ मोबाइल जप्त केले. 

 

 

नालासोपारा प्रकरणानंतर राज्यभरात धाडसत्र
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी कारवाई महाराष्ट्र एटीएसने 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे केली होती. सनातन संस्थेचा साधक असलेल्या वैभव सुभाष राऊत या तरुणाच्या घरी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. तेव्हा या प्रकरणाच्या तपासात राज्यभरात धाडसत्रे सुरू केली. या धाडसत्रांत वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. तर 6 सप्टेंबर रोजी साकळी, ता. यावल (जि. जळगाव) येथे दुपारी अचानक एटीएसची दोन पथके दाखल झाली व त्यातील एका पथकाने वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. 7 सप्टेंबर रोजी गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी (वय 34) यास ताब्यात घेतले होते. चौकशीअंती शनिवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रविवारी दुपारी या दोघांना मुंबई न्यायालयात हजर केले असता दोघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याचा आरोप एटीएसने केला आहे.

 

नालासोपारा प्रकरणीच अटक
आजवर या दोघांना कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतले याची माहिती कुणालाच एटीएसच्या पथकाने दिली नव्हती. मात्र, आता या दोघांना नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या पाच जणांकडून मिळालेल्या माहितीवरून अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...