आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात औरंगाबादेतून चाैघे ताब्यात; पिस्तुलासह काडतुसेही जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात सचिन अणदुरेच्या अटकेनंतर एटीएस व सीबीआयने मंगळवारी औरंगाबादेत अणदुरेचे नातेवाईक व मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी केली. छाप्यात एक ७.६५ बोअरचा गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व १ कुकरीही जप्त केली. ही बंदूक दाभोलकर हत्येत वापरलेल्या बंदुकीसारखीच आहे. त्यांची बॅलेस्टिक चाचणी केली जाईल.


सीबीआय-एटीएसच्या पथकाने मंगळवारी सचिनचे मेहुणे शुभम सूर्यकांत सुरळे (२२) व अजिंक्य शशिकांत सुरळे (२०, दोघेही रा. औरंगपुरा), त्यांचे मित्र रोहित राजू रेगे (२०) व नचिकेत इंगळे यांनाही ताब्यात घेतले. हर्सूल येथे राहणारा भाऊ प्रवीण याचीही चौकशी केली. मात्र, त्यांच्यावर काय आरोप आहेत हे स्पष्ट नाही. चौकशी व घर झडतीत एक पिस्तूल जप्त केल्याची पुष्टी राज्याचे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.


एटीएस अधिकारी मुंबईत
महाराष्ट्रातील सर्व एटीएसचे अधिकारी सध्या मुंबईत आहेत. औरंगाबाद व इतर जिल्ह्यांत मिळून ७५ कर्मचारी स्थानिक कार्यालयांत आहेत. मुंबईतून कारवाईची सूत्रे हलवण्यात येत आहेत. 


सोमवारी रात्री १२ पासून कारवाई 
सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एटीएस व सीबीआयचे अधिकारी खासगी वाहनांतून औरंगपुरा चौकातील सुरळे यांच्या घरी आले. त्यांनी तेथे काही तास चौकशी केली. नंतर हे पथक बीड बायपास येथे मंजित प्राइड या इमारतीत गेले. तेथे नचिकेत इंगळेच्या फ्लॅटमध्ये धावणी मोहल्ल्यातील रोहित राजू रेगे हा आला होता. त्यालाही या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


मित्रांनी गिफ्ट म्हणून दिले पिस्तूल
सूत्रांनुसार, शुभम व अजिंक्यने मेहुणा अणदुरेकडील शस्त्रे रोहित रेगेच्या घरात ठेवली होती. रोहितची अलिकडेच या दाेघांशी मैत्री झाली होती. त्यांनी गिफ्ट म्हणून ही ‘वस्तू’ रोहितकडे आणून ठेवली होती. त्याला याबद्दल काहीच माहीत नसल्याचे रेगे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शुभम, अजिंक्य व रोहितवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


दाभोलकर हत्येच्या वेळी तरुणांचे वय १५-१६ वर्षांचे
> ताब्यात घेतलेले तीन तरुण २० ते २२ वर्षांचे आहेत. यातील एक इंजिनिअरिंग शिकत असून दोघांनी बीएस्सी पूर्ण केले आहे. दाभोलकरांची हत्या २०१३ मध्ये झाली, तेव्हा या मुलांचे वय अवघे १५ ते १६ वर्षे होते. त्यामुळे या मुलांचा या घटनेत नेमका काय सहभाग होता हे अजून स्पष्ट नाही.
> दोघे अणदुरेचे मेहुणे, तर १ मित्र आहे. २ दिवसांपूर्वी सचिनच्या पत्नीने या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही, असा दावा केला होता. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाली. मात्र, कारवाईत गुप्तता पाळली जात आहे. मंगळवारी मुंबईत एटीएसने याबाबत मोघम माहिती दिली.


ही कारवाई सीबीआयची
मंगळवारी औरंगाबादेत झालेली कारवाई ही सीबीआयची आहे. महाराष्ट्र एटीएस यात फक्त सहकार्याच्या भूमिकेत आहेत. दाभोलकर हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.


पांगारकरच्या घरी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या चकरा 
जालना : जालन्याचा श्रीकांत पांगारकर याची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या घरी बँकांचे वसुली प्रतिनिधी येत आहेत. परंतु, श्रीकांत पांगारकरचे घर बंद असल्यामुळे त्यांना माघारी जावे लागत आहे.

 

कळसकरच्या चौकशीतून आले सचिनचे नाव
शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला शरद कळसकर औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले होते. दरम्यान कळसकरनंतर १४ ऑगस्टला राजाबाजार भागातून एटीएसने सचिनला पकडले होते.

 

कळसकरशी होती त्याची मैत्री
शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत यांच्या जवळून संपर्कात असलेला दौलताबाद येथील शरद कळसकर याचा सचिन अणदुरे हा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. शरदला एटीएसने ताब्यात घेताच सचिनचे नाव समोर आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

 

जप्त केलेल्या दुचाकीचा संदर्भ जुळला

काही वर्षांपूर्वी दाभोलकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी औरंगाबादची असल्याचे तपासात समोर आले होते. तेव्हा काही संशयितांची रेखाचित्रे जाहीर करण्यात आली होती. तेव्हाच सचिनची चौकशी झाली होती, अशी माहिती समोर येत आहे.

 

राजाबाजारमध्ये होते सचिनचे वास्तव्य
सचिन अणदुरे विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. एक मोठा भाऊ आहे. राजाबाजार कुंवारफल्ली भागातील तो रहिवासी आहे. सचिननेच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

 

सचिनच्या फेसबुक पोस्टवर होते लक्ष
एटीएसने सचिनच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले होते. त्याने अनेक हिंदुत्ववादी पोस्ट केल्या आहेत. तेव्हापासून एटीएसचे लक्ष होते. नऊ महिन्यांपूर्वीच तो कुंवारफल्ली परिसरात राहण्यास आला होता. 

बातम्या आणखी आहेत...